सातारा: पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांनी ८१ वर्षांपूर्वी सातारा जिल्हा तुरुंगाच्या तटावरून उडी टाकली. अण्णांनी तुरुंग फोडून भारतीय स्वातंत्र्य चळवळ गतिमान केली. याचे स्मरण नव्या पिढीने ठेवणे महत्त्वाचे आहे. अण्णांच्या जीवनचरित्रातून आजच्या तरुणांनी देशप्रेम, शौर्य, प्रेरणा घ्यावी म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून आपण पाळतो, असे प्रतिपादन हुतात्मा शिक्षण उद्योगसमूह वाळवा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह (जेल) येथे स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण केल्यानंतर नायकवडी बोलत होते. या वेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के, कारागृहप्रमुख रमाकांत शेडगे, वीरधवल नायकवडी, व्ही. बी. पाटील, सर्व शिक्षक, सर्व प्राध्यापक, हुतात्मा संकुलातील अनेक प्रमुख पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, की देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकारांनी प्रयत्न केले. अनेकांनी प्राणांची आहुती दिली. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाबद्दल नव्या पिढीला अभिमान आहे. १० सप्टेंबर हा दिवस सर्वांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. नव्या पिढीला हा इतिहास कळावा म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून सर्वांनी साजरा केला पाहिजे.
या दिवसापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रतिसरकार स्थापन झाले. त्यामध्ये नागनाथअण्णा नायकवडी यांची खूप महत्त्वाची भूमिका होती. तब्बल ६४० गावांमध्ये प्रतिसरकार होते. इंग्रज सरकारच्या सत्तेपुढे ते झुकले नाही. नागनाथ अण्णांची ही चळवळ, सातारा ही घटना इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखी आहे. या घटनेतून प्रेरणा घेत सर्वांनी एकजुटीने देश एकसंध ठेवला पाहिजे. कारागृहप्रमुख रमाकांत शेडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी कारागृह स्मृतिस्तंभावर वैभव नायकवडी व सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. या वेळी हणमंत पाटील, प्रा. विजय निकम, असलम तडसरकर, शंकर पाटील, दत्ताजी जाधव, बाळासाहेब पाटील, कुमार शिंदे, दिलीप सूर्यवंशी, प्रा. राजा माळगी, विश्वास मुळीक, शिवाजी शंकर पाटील, राजाराम शिंदे, अजित वाजे, तुकाराम डवंग, नारायण कारंडे, जयकर चव्हाण, बाळासाहेब नायकवडी, श्री. बाबर, सामाजिक कार्यकर्ते, प्रमुख मान्यवर आदी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांकडून सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह (जेल) येथे स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र व पुष्पांजली अर्पण करण्यात आली.