​सावंतवाडी : सावंतवाडी येथील धावपटू कुमार कबीर हेरेकर याची ‘टाटा अल्ट्रा मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सावंतवाडी येथील शांतिनिकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा कबीर हा वयाच्या अवघ्या ९ वर्षे २ महिन्यातच या मोठ्या स्पर्धेत पात्र ठरला आहे. ही निवड मुंबई येथे झालेल्या ‘मुंबई १०के चॅलेंज मॅरेथॉन’ स्पर्धेतील त्याच्या कामगिरीवर आधारित आहे.७ सप्टेंबर रोजी K.A sports, डेकॅथलॉन आणि मुंबई डिस्ट्रिक्ट ऍथलेटिक्स असोसिएशनने संयुक्तपणे या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉनसाठीची एक पात्रता फेरी होती. स्पर्धेत १० किलोमीटर अंतरासाठी ११०० हून अधिक धावपटूंनी भाग घेतला होता.

यातील एक स्पर्धक कबीर हेरेकरही होता, ज्याने १ तास ३ मिनिटांत १० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. विशेष म्हणजे, कबीर हा या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व धावपटूंमध्ये सर्वात लहान होता. ​या स्पर्धेतील कबीरची कामगिरी सर्वांसाठीच आश्चर्यकारक होती. कारण ११०० हून अधिक स्पर्धकांमध्ये तो २४९ व्या स्थानावर पोहोचला. हे स्थान मिळवणारा तो सर्वात लहान खेळाडू ठरला, कारण त्याच्याव्यतिरिक्त इतर सर्व स्पर्धक १६ वर्षांवरील होते.

​कबीरची ही ४० वी मॅरेथॉन स्पर्धा होती. आजच्या काळात जिथे लहान मुले मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आहेत, तिथे कबीरने धावण्याच्या आवडीतून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्याची ही जिद्द आणि आवड पाहून अनेक लोकांनी त्याचे कौतुक केले आणि त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली. भविष्यात ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.