लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी आवश्यक आहे. या योजनेची चर्चा गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून सुरु झाली होती. ही योजना सरकार निवडून आल्यावर चालवणारच नाही बंद करेल वगैरे विरोधकांनी बरीच आवई उठवली पण तसं घडलं नाही. ही योजना सुरु राहिली. दरम्यान या योजनेवर विविध आरोप होत आहेत. दोन दिवसांपूर्वी आणि त्याआधीही सुप्रिया सुळेंनी या योजनेत ४५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही केला. तरीही ही योजना सुरु आहे. दरम्यान या योजनेसंदर्भात आता नवी माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. कशी आहे प्रक्रिया आपण जाणून घेऊ.
ई केवायसीसाठी कुठली कागदपत्रं आवश्यक?
१) आधार कार्ड
२) लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो
३) डोमिसाइल, रेशन कार्ड किंवा व्होटर आयडी
४) उत्पन्नाचा दाखला
५) बँक खात्याचं विवरण
ही कागदपत्रं महिलांना ई केवायसीसाठी लागणार आहेत. सरकारची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in यावर तुम्हाला याबाबतची माहिती मिळणार आहे.
प्रक्रिया नेमकी कशी आहे?
सरकारची वेबसाईट सुरु करा, त्यावर ई केवायसी वर क्लिक करा.
त्यानंतर नाव, पत्ता, रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक भरा
तसंच जी आवश्यक कागदपत्रं आहेत ती जोडा
त्यानंतर सबमिटचं बटण दाबा आणि कन्फर्मेशनची वाट बघा. त्यानंतर काही वेळात कन्फर्मेशन येईल.
ई केवायसी का आवश्यक आहे?
सरकारचं म्हणणं आहे की ई केवायसी ही फक्त औपचारिकता नाही. यामुळे खऱ्या लाभार्थी महिला आणि बनावट लाभार्थी यांच्यातला फरक ओळखणं सोपं होणार आहे. डिसेंबर महिन्यात अशा घटना समोर आल्या होत्या ज्यामध्ये बनावट लाभार्थी असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता ई केवायसी प्रक्रिया बंधनकारकर करण्यात आली आहे. केवायसी अपडेट केल्यानंतर दरवर्षी महिलांना त्यांची कागदपत्रं अपडेट करावी लागणार आहेत. त्यामुळे १५०० रुपये थेट त्यांच्या खात्यात जाणार आहेत. ई केवायसी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच छाननी करण्यात आल्यानंतर अनेक अपात्र महिलांनी आणि पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. सुमारे २२ लाखांहून अधिक महिलांना लाभ मिळणं बंद झालं आहे. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती पारदर्शक करण्यात येते आहे असं मंत्री आदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं होतं. आता ई केवायसी अपडेट करणं हे बंधनकारक असणार आहे.