महापुराच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी चौहीबाजूंनी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. अनेक संस्था, संघटना पुढे येऊ लागल्या आहे. मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने पूरग्रस्तांसाठी २५ लाख, तर चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने ५ लाखांची मदत केली आहे.

मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना पुराचा फटका बसला. लोकांना आपले संसार उघड्यावर टाकून मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. या विध्वसात जीवितहानीसह प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. दरम्यान, पूर ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर राज्यभरातून नागरिक, संस्था, संघटना वेगवेगळ्या माध्यमातून मदतीसाठी पुढे आल्या आहेत.
मुंबईतील गणेश मंडळांनी सजावटीवरील अनावश्यक खर्चाला कात्री लावून पूरग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले होते. त्याला लालबागचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला. लालबागचा राजा मंडळाने २५ लाख रूपये दिले आहेत. तसेच एका गावाचे पुनर्वसनही मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने प्रशासनाची मदत घेऊन पुनर्वसनाचे काम केले जाणार आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी मंडळाने ५ लाख रूपये दिले आहेत. ही रक्कम मुख्यमंत्री निधीत जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत देणाऱ्या संस्था, संघटनांची नावे ट्विटरवर जाहीर केली आहेत. यात एक लाखांपासून एक कोटींपर्यंत मदत करणाऱ्यांची नावे निधीसह ही नावे दिली आहेत. दरम्यान, अभिनेते नाना पाटेकर यांनी आज कोल्हापुरातल्या शिरोळमध्ये भेट दिली. शिरोळमध्ये ५०० घरं बांधणार असल्याचं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं आहे. शासनाने काही निधी दिला आहे. बाकीचे पैसे आम्ही देतो आहे. मला यासाठी कोणतंही श्रेय नको जे काही करतोय ते आपण सगळे करतो आहोत असंही नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे.