वैभववाडी, तालुक्यातील भुईबावडा घाटात मोठी दरड कोसळल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरडीमध्ये मोठ्या प्रमाणात दगड आणि मातीचा ढिगारा साचल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ कार्यवाही करत दरड हटवण्यासाठी जेसीबी घटनास्थळी दाखल केले आहेत. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात येईल. तोपर्यंत प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊसाने उघडीप साधली आहे. मात्र सह्याद्रीच्या पट्ट्यात पाऊस अधूनमधून कोसळत आहे. त्यामुळे घाट रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.