मुंबई : निवासी डॉक्टरांच्या आत्महत्या आणि त्यांच्या मानसिक ताणतणावाचा विचार करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचलनालयाने ‘संवाद’ नावाची मानसिक आरोग्य हेल्पलाईन अलीकडेच सुरू केली. मात्र गेल्या महिनाभरात अवघ्या १२ निवसी डॉक्टरांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधून मानसिक आरोग्यविषयक सल्ला घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील ११९ निवासी डॉक्टरांनी गेल्या पाच वर्षात आत्महत्या केल्या असून ११६६ डॉक्टर व निवासी डॉक्टरांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून दिल्याचे नॅशनल मेडिकल कमिशनच्या (एनएमसी) अहवालात नमूद करण्यात आले आहे. एनएमसीने देशातील ५१२ वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर व पदवी शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांच्या विविध समस्यांचा आढवा घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या कामाच्या वेळा, ताणतणाव, राहाण्याच्या सुविधा, सुट्ट्या आदी विविध मुद्यांचा यात आढावा घेण्यात आला. अलीकडेच केईएममधील एका निवासी डॉक्टरने आत्महत्या केल्यामुळे निवासी डॉक्टरांची ‘मार्ड’ संघटना आक्रमक झाली असून निवासी डॉक्टरांना वरिष्ठांकडून होणारा त्रास, कामाच्या वेळा, निवास व्यवस्थेसह सर्व प्रश्न धसास लावण्याचा निर्धार ‘मार्ड’ने केला आहे.

हेही वाचा- पोटावरील चरबी करायची आहे ? ‘कीगल’ व्यायाम ठरू शकतो फायदेशीर, जाणून घ्या

केईएममधील निवासी डॉक्टरच्या आत्महत्येची गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त (आरोग्य) डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी मार्डच्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी बेहिशेबी कामाच्या वेळा, वरिष्ठ डॉक्टरांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक व हेटाळणी, प्राध्यापक वा सहयोगी प्राध्यापकांडून पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, अपुरी व निकृष्ट निवास व्यवस्था, रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारी शिवीगाळ असे अनेक मुद्दे उपस्थित निवासी डॉक्टरांनी मांडले. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी डॉक्टरांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले जातील असे आश्वासन यावेळी दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा- अनेकांना इमोशनल गाणी ऐकायला का आवडतात? त्यामुळे खरोखर व्यक्तीचा मूड ठीक होतो का? वाचा डॉक्टर काय सांगतायत

वैद्यकीय शिक्षण संचलनालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये विविध कारणांमुळे येणारे नैराश्य लक्षात घेऊन वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद’ नावाची मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेतला. शासकीय, अभिमत, तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील वाढत्या आत्महत्येच्या प्रमाणाची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. अश्विनी जोशी यांनी २३ फेब्रुवारी रोजी या विषयावर एक बैठक घेतली. या बैठकीत वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची मानसिकता जाणून घेऊन त्यांचे समुपदेशन करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे तसेच त्यांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करणे यासाठी ‘संवाद’ हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अलीकडेच १४४९९ क्रमांकाची संवाद हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यापूर्वी ‘मनसंवाद’ नावाने अशाच प्रकारची एक हेल्पलाईन अस्तित्वात होती. त्याऐवजी आता संवाद हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून या हेल्पलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या समुपदेशनामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता.

हेही वाचा- नकारात्मक भावनांचाही व्हावा स्वीकार! अशाप्रकारे करा नैराश्यावर मात

तथापि गेल्या महिनाभरात या १४४९९ या हेल्पलाईनवर केवळ ७१ दूरध्वनी आले. त्यापैकी केवळ १२ वैद्यकीय विद्यार्थ्यांचे दूरध्वनी आल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले यांना विचारले असता, वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील ताणतणाव व आत्महत्या ही गंभीर बाब असून आम्ही यावर वेगवगेळ्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘संवाद’ हेल्पलाईन संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल, तसेच आगामी काळात ‘मेंटल हेल्थ मिशन’ आणि अध्यापक व विद्यार्थ्यी यांच्यातील संवादात वाढ करण्यापासून अनेक उपाय केले जातील. तसेच विद्यार्थ्यांच्या ताणतणावांची कारणे लक्षात घेऊन त्यावरही काम केले जात असल्याचे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले.