वाई: शाळेला लागलेल्या सुट्टय़ा आणि राज्यभर अंग भाजून काढणाऱ्या उन्हाळय़ामुळे थंड हवेचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामात पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या वेण्णालेकसह सर्व पॉईंट आणि मुख्य बाजारपेठ पर्यटकांनी फुलून गेली आहे.गेल्या काही दिवसात राज्यभर कमालीचा उकाडा वाढला आहे. शाळांना लागलेल्या सुट्टय़ा आणि या उकाडय़ामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी महाबळेश्वरकडे आपली पावले वळवली आहेत. सध्या येथे दिवसभर आल्हाददायक वातावरण आणि सायंकाळपासून सकाळपर्यंत थोडीशी थंड हवेची अनुभूती आहे. या बदललेल्या वातावरणामुळं पर्यटक खूश आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाबळेश्वरचे आकर्षण असलेल्या ऑर्थरसीट पॉईंटसह पौराणिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले श्रीक्षेत्र महाबळेश्वर, केट्स पॉईंट तसेच पश्चिम घाटाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध लॉडविक व एलिफंट हेड सोबतच सायंकाळी मुंबई पॉईंट येथे सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे. ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, शिवकालीन खेडेगाव, मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा पाहण्यासाठी पर्यटक आवर्जून भेट देत आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला तर चौपाटीचे स्वरूप आले असून पाणीपातळी घटली तरी नौकाविहाराचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. सोबतच गरमागरम कणीस, पावभाजी, पाणीपुरी, भेळ तर येथील चविष्ट स्ट्रॉबेरी विथ क्रीम, विविध रंगी आईस गोळासारख्या थंड पदार्थावर देखील पर्यटक ताव मारताना पाहावयास मिळत आहेत. अनेक हौशी पर्यटक वेण्णालेक परिसरात घोडेसवारीचा आनंद घेत आहेत. येथील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत. पर्यटक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यानंतर खरेदीसाठी येथील मुख्य बाजारपेठेत पर्यटक गर्दी करत आहेत. येथील चणा, चिक्की, जाम सोबतच प्रसिद्ध चप्पलची खरेदी पर्यटकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahabaleshwar tourist crowd in pachgani amy