गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर भाजपावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडघड बोलून दाखवली आहे. अशातच आता महादेव जानकर यांनी ‘इंडिया’ आघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. आम्ही ‘इंडिया’ आघाडीकडे महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी केली आहे, असं जानकर यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
‘इंडिया’ आघाडीत सहभागी झाला, तर किती जागांची मागणी करणार? या प्रश्नावर जानकर म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रातील लोकसभेच्या पाच जागांची मागणी ‘इंडिया’ आघाडीकडं केली आहे. किमान तीन तरी जागा मिळाव्यात. देशातील प्रत्येक राज्यांमध्ये जागांची मागणी ‘इंडिया’ आघाडीकडे करणार आहे.”
“…तर धनगर समाजाचा प्रश्न सुटेल”
“मराठी आणि धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल, तर संसदेतून कोटा वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही आणि मराठ्यांनाही न्याय मिळेल. धनगर समाजाला आदिवासीप्रमाणे नियम निघाले पाहिजेत. त्यासाठी राज्य सरकारने एखादा आयोग नेमून अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा. सर्व पक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटले तर धनगर समाजाचा प्रश्न सुटेल,” असं महादेव जानकर यांनी म्हटलं.
“…म्हणून आमचा पक्ष भाजपा आणि काँग्रेसपेक्षा मोठा करायचा आहे”
“धनगर समाजाचे किती आयएएस आणि आयएसआय अधिकारी, खासदार, शाळा आणि विद्यापीठ ताब्यात आहेत. शून्य आहेत. प्रजेला न्याय देऊ शकत नसेल, तर राजा बरोबर नाही. काँग्रेसने आमच्यावर अन्याय केला. तिच अवस्था भाजपा करत आहे. दोघांची समान तुलना करतोय. म्हणून आमचा पक्ष भाजपा आणि काँग्रेसपेक्षा मोठा करायचा आहे,” असं महादेव जानकर यांनी सांगितलं.