राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे. एकूण २ लाख, १४ हजार उमेदवारांचे भवितव्य आजच्या मतमोजणीमध्ये ठरणार आहे. या मतमोजणीचे अनेक निकाल हाती आले असून राज्यामध्ये सर्वच पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी यश मिळाल्याचे चित्र दिसत आहे. कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये मोठी चुरस दिसून येत आहे. कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिल्यानंतर राणे कुटुंबाला शिवसेनेचा धक्का या अर्थाने बातम्या फिरु लागल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सर्वाधिक जागा भाजपानेच जिंकल्याचा दावा केला आहे. इतकचं नाही तर प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणेंनी राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही असंही म्हटलं आहे. कोणत्याही नेत्याचं नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली आहे.
आज सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली. कोकणामधील कणकवली तालुक्यातील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निकालाच्या माध्यमातून राणे कुटुंबाला शिवसेनेने पाहिला धक्का दिला. भाजपा आणि नितेश राणे यांना धक्का देत सिंधुदुर्ग तालुक्यातील कणकवलीमधील भिरंवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारली आहे. एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधील चार सदस्य बिनविरोध निवडून आले होते. या सर्व सदस्यांवर शिवसेनेने दावा केला होता. उर्वरित तीन सदस्यांसाठी निवडणूक झाली त्यामध्ये तिन्ही सदस्य शिवसेनेचेच निवडून आले आहेत. कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजपकडे गेली आहे. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे गेलीय.
हा निकाल म्हणजे राणेंना धक्का असल्याच्या बातम्या चालू लागल्यानंतर नितेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केलाय. “राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, ७० पैकी ५५ ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या आहेत,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.
भाजपाकडून कणकवलीची परतफेड
कोकणामधील कणकवली तालुक्यात शिवसेनेने भाजपाला म्हणजेच राणे कुटुंबाला धक्का दिला असला तरी दुसरीकडे मालवणमध्ये भाजपाने त्याची परफेड केली आहे. मालवणमधील सहापैकी पाच ग्रामपंचायतींवर कमळ फुललं आहे. मलावणमधील हा पराभव शिवसेनेबरोबरच स्थानिक शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
आणखी वाचा- १४ हजार पैकी ६ हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपा नंबर १ असेल – उपाध्ये
मालवण कुडाळमध्ये भाजपाची मुसंडी
मलावणमधील चिंदर, पेंडुर, कुंकवळे, मसदे आणि गोळवन या ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तर आवडवली या एकमेव ग्रामपंचायतीवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. मलावणमध्ये शिवसेना आमदार वैभाव नाईक आणि भाजपा नेते नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. अखेर मालवणमध्ये भाजपा हा मोठ्या फरकाने शिवसेनेवर भारी पडल्याचे चित्र निवडणुकीमधून स्पष्ट झालं आहे. कुडाळमध्येही वैभव नाईक यांना जबरदस्त धक्का देत भाजपाने मुसंडी मारली आहे. एकूण १५ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेला सहा तर भाजपचा नऊ ग्रामपंचायतीत मोठा विजय मिळला आहे.
मोठा बंदोबस्त
आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा कणकवली तहसीलदार कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कणकवली तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून एक ग्रामपंचायत बिनविरोध झालीय. कणकवली हा आमदार नितेश राणेंचा गड मानला जातो त्यामुळेच येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कणकवलीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेलं राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाली.
आणखी वाचा- राम शिंदेंना रोहित पवार पुन्हा पडले भारी; चौंडीत राष्ट्रवादीनं उधळला गुलाल
सावर्डेमध्ये राष्ट्रवादी
रत्नागिरीमधील सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. स्थानिक आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकहाती विजय मिळवला आहे. सर्व नऊच्या नऊ जागांवर निकम पॅनलचे उमेदवार विजयी झालेत. एकूण १७ ग्रामपंचायत उमेदवारांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. उरलेल्या नऊही जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात.