वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघ

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शेवटच्या क्षणी सूत्रे हाती घेत रचलेले डावपेच निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

भाजपचे आंबटकर विरुद्ध काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ  यांच्यात थेट रंगलेल्या या लढतीत ९९.७२ टक्के मतदान झाले. भाजप नेत्यांनी तीनपैकी केवळ वर्धा जिल्हय़ावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. वर्धा, आर्वी व हिंगणघाटच्या भाजप नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा होती. आमदार डॉ. पंकज भोयर व समीर कुणावार यांना त्या अनुषंगाने जाबदारी सोपविण्यात आली होती. पण धोका नको म्हणून शेवटच्या क्षणी दत्ता मेघे यांना वर्धा जिल्हय़ाची सूत्रे सोपविण्यात आली. क्रॉस व्होटिंग भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचा सूचक इशारा मेघेंनी दिला. तेव्हाच चित्र स्पष्ट होत गेले. भाजप विरोधक पण कट्टर मेघे अनुयायी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काहींची मते फुटल्याची चर्चा मतदानानंतर उसळली होती. दोन राकॉ सदस्यसुद्धा भाजपच्या खेम्यात वळल्याचे सांगण्यात आले. पण ही बाब मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. एकूण मतदारांमध्ये भाजपचे ४९५ असे घसघशीत संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे केवळ २६० सदस्य आहे. काँग्रेसला प्रथम पसंतीची मते मिळविण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. जिल्हय़ातील काँग्रेस नेते या निवडणुकीत फोरसे उत्सुक असल्याचे कुठेही दिसून आले नाही. भाजपच्या खासदारासह सर्व खेमा शेवटच्या क्षणापर्यंत राबला. संख्याबळ व नेत्यांनी पार पाडलेल्या जबाबदारीमुळे भाजपच्या आंबटकरांचे पारडे निश्चितच वरचढ झाले आहे.