राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेना तिसऱ्या स्थानी आहे. काँग्रेसही शिवसेनेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी आहे. तर अर्थ खाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच राज्यात निधीवाटपात अव्वलस्थानी आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्याकडूनही ४२० कोटींची तरतूद असूनही आतापर्यंत फक्त तीन टक्के म्हणजे १४ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या खात्याची ही अवस्था असेल तर शिवसेनेच्या अन्य मंत्र्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये निधी वाटपातही मोठी असमानता असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात निधी वाटपात सर्वात कमी निधी हा शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या खात्यांना मिळाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा किमान समान कार्यक्रम ठरला असताना निधी वाटपात आणि खर्चात होत असलेल्या भेदभावामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, २०२० ते २१ या वर्षातील निधीवाटपाच्या आकडेवारुनुसार सर्वाधिक आमदार असणारा आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष मात्र पिछाडीवर आहे. त्यामुळे किमान समान कार्यक्रम कार्यक्रमावर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये निधीवाटपात मात्र समानता दिसत नाही.
कोणत्या पक्षाला किती निधी?
शिवसेना ५९ आमदार
निधी ५२२५५ कोटी
काँग्रेस ४३ आमदार
निधी १०००२४ कोटी
राष्ट्रवादी काँग्रेस ५३ आमदार
निधी २२४४११ कोटी
या आकडेवारीवरुन सर्वाधिक आमदार आणि मुख्यमंत्री पद असलेल्या शिवसेनेच्या वाट्याला सर्वात कमी निधी मिळाला आहे. तर पाच आमदार कमी असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस निधी मिळवण्यात मात्र सर्वात अव्वल आहे. शिवसेनेपेक्षा चौपट जास्त निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागांना मिळाला आहे.
दरम्यान, निधी वाटपाचा फटका आदित्य ठाकरे यांनाही बसला आहे. पर्यावरण विभागात एकूण ४२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी फक्त तीन टक्के रक्कम म्हणजे १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.