महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. दररोजचे त्यांचे ट्वीट्स, पत्रकारपरिषदा आत्ता कुठे थंडावल्याचं चित्र असतानाच आता पुन्हा एकदा मलिक यांचं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहेत. सरकारी पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण चहा बिस्कीटासह तयार असल्याचं मलिक यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मलिक यांनी काल केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, मला असं कळलं आहे की उद्या सकाळी सकाळीच माझ्या घरी काही सरकारी पाहुणे येणार आहेत. मी त्यांच्या स्वागतासाठी चहा बिस्कीटांसह तयार आहे. त्यांना जर माझं घर सापडलं नाही, तर त्यांनी मला फोन करावा.

मलिक यांच्या या सूचक ट्वीटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नक्की कोण सरकारी पाहुणे येणार याबद्दल मलिक यांनी कोणतंही भाष्य केलेलं नसलं तरी यातून त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांचा छापा पडणार आहे का? अशीच शक्यता निर्माण होत आहे. त्यांनी उल्लेख केलेले सरकारी पाहुणे हे इनकम टॅक्स विभाग आहे की ईडी यावरुन आता नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र या ट्वीटसंदर्भात मलिक यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे हे सरकारी पाहुणे नक्की कोण ? याचा खुलासा येणारा काळच करेल.