केलेल्या गुन्ह्य़ाबद्दल तुरुंगात शिक्षा भोगायची आणि संचित रजेचा (पॅरोल) फायदा घेऊन पोलिसांच्या कचाटय़ातून पसार व्हायचे, अशा प्रकारे पसार झालेल्या कैद्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या २०१२च्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची पद्धत आहे. मात्र, पॅरोलची मुदत संपताच कैद्याने पुन्हा तुरुंगात परतणे अपेक्षित असते. पॅरोलवर कैद्यांची सुटका होण्यात पंजाब व मध्य प्रदेश आघाडीवर आहेत. मात्र, पॅरोलवर सुटका झाल्यावर पुन्हा तुरुंगात न येणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षभरात राज्यातील विविध तुरुंगातून अशा प्रकारे पॅरोलवर असलेले २०० कैदी फरार झाले आहेत. विशेष म्हणजे, ते पकडले जाण्याचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात २०१२ मध्ये एकूण ३६ हजार ४५९ कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. त्यापैकी ५६३ कैदी परत आले नाहीत. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २०० जणांना पुन्हा पकडण्यात आले. पंजाबात नऊ हजार कैद्यांना पॅरोलवर सोडले. मध्य प्रदेशात ही संख्या ७३०० होती. या दोन राज्यांतील एकूण १६,३०० कैद्यांपैकी ११९ जण पसार झाले. मात्र, त्यापैकी ६२ कैद्यांना पुन्हा पकडण्यात आले.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये २०१२ मध्ये २८०० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यापैकी १९८ कैदी परत आलेच नाही. त्यापैकी ४१ कैद्यांना पुन्हा पकडण्यात यश आले. पंजाब आणि मध्य प्रदेशातील कारागृहातून सर्वाधिक कैदी सोडले, तरी परत येण्याचे आणि पळून गेल्यानंतर पकडण्याचे प्रमाण चांगले आहे. मात्र, महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत कमी कैदी पॅरोलवर सोडले असले, तरी पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारागृहातून ३७ कैदी पसार
राज्यातील विविध कारागृहांत शिक्षा भोगत असताना गेल्या वर्षी ३७ कैदी पळून गेले आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती कारागृहातील १६ कैद्यांचा समावेश आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृह आणि उस्मानाबाद जिल्हा कारागृहातून प्रत्येकी पाच कैदी शिक्षा भोगत असताना पळून गेल्याची नोंद राज्याच्या कारागृह अहवाल दिली आहे.

कायदेशीर पूर्ततेअभावी संजय दत्त कारागृहातच!
मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा भोगत असलेला संजय दत्तला पुण्याचे विभागीय आयुक्तांनी तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. मात्र, त्याला सोडण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर गोष्टीची पूर्तता न झाल्यामुळे त्याला अद्याप रजेवर सोडण्यात आलेले नाही. कायदेशीर गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर संजय दत्तला रजेवर सोडण्यात येईल, अशी माहिती येरवडा कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra prison on top in misusing of parole