महाराष्ट्रात २००४ साली झालेली दंगल घडवण्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हात होता का? याची चौकशी पोलिसांनी करावी. तसेच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले, पुन्हा एकदा महाराष्ट्रा दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्लॅन आहे का याचा तपास केला पाहिजे. उद्धव ठाकरे तीन दिवसांपूर्वी अकोला आणि नगरच्या शेवगावात झालेल्या दंगलींमागचे मास्टरमाईंड असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. दरम्यान, आता या दंगलींची आणि नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.

संजय शिरसाट म्हणाले, भाजपा आमदार नितेश राणे यांनी जे आरोप केले आहेत ते खूप गंभीर आहेत. तिथे (मातोश्री – उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) झालेली बैठक, त्या बैठकीत असलेला नेता, लोकाधिकार समितीचा सरचिटणीस, या घटनांकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. या छोट्या मोठ्या दंगलींमागे कोणाचा हात आहे, हे तपासलं पाहिजे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले, त्या बैठकीची (नितेश राणे यांनी उल्लेख केलेल्या २००४ च्या बैठकीची) पुनरावृत्ती होतेय का? त्याचा पार्ट टू होतोय का? हे तपासलं पाहिजे. तसेच या सगळ्या प्रकाराचं समर्थन हेच लोक करतायत. आपल्या राज्यात दंगली होणं योग्य नाही. यांनी (महाविकास आघाडी) अडीच वर्ष सत्ता भोगली, आता ती सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी पुन्हा तोच प्रकार होतोय का? मला मातोश्रीवर थेट आरोप करायचा नाही, परंतु सत्य समोर आलं पाहिजे.

हे ही वाचा >> “नड्डा साहेबांचा पीए बोलतोय…”, मंत्रिपदासाठी भाजपा आमदारांकडे पैसे मागणाऱ्या भामट्याचा विकास कुंभारेंना फोन, म्हणाला…

संजय शिरसाट म्हमाले, नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. त्यात काही तथ्य नसेल तर हरकत नाही, परंतु एसआयटी चौकशी झालीच पाहिजे. मी यासंबंधी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे.