Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Voting Live Updates: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६०.५ टक्के मतदान पार पडलं आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं
राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू झालं होतं. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली होती, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
९६ हजार मतदान केंद्रे
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली होती, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
Highlights
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ५४.५३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात आज दुपारी तीन वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले. त्यानंतरही राज्याच्या विविध भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी जात आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले.
ईव्हीएमसंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून एकूण २२१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदार संघात सर्वात जास्त १३ तक्रारी करण्यात आल्या आहेत. नांदेड उत्तर मतदार संघात १० आणि नांदेड दक्षिणमध्ये नऊ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत,
राज्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी ३५ टक्के मतदान झाले आहे. सातारा जिल्ह्यात ४८.१३ टक्के, सांगली जिल्ह्यात ३९ टक्के, लातूर ४३.३, पुणे जिल्ह्यात दुपारपर्यंत ४१ टक्के मतदान झाले आहे. यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीनं चाळीशी ओलांडली आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला आणि मतदानाच्या दिवशी सुरू असलेल्या पावसामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदारांनाही मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. पंरतु पुण्यातील एका मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकमेकांना जोडून मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

फोटो : सागर कासार
पुण्यात तरुण मतदारांनी पहिल्यांदाच मतदान केलं आणि त्यानंतर मतदानाबाबत काय वाटतं ती भूमिकाही मांडली.
राज्यात सर्वत्र मतदान सुरू असून, काही ठिकाणी गालबोट लागल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आला आहे. दुपारी एक वाजता ईव्हीएम बंद पडल्यानं मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत.
भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये घसरलेलं मतदान हे बोलकं आहे. शरद पवारांनी केलेल्या जादूमुळे तरूणाई मतदानासाठी बाहेर पडल्याचे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.
सविस्तर वाचा-
भाजपाच्या बालेकिल्ल्यात घसरलेलं मतदान बोलकं : जितेंद्र आव्हाडhttps://t.co/aXWT69wfi8
— LoksattaLive (@LoksattaLive) October 21, 2019
सकाळपासून परळीत पावसाचा जोर आहे. मात्र आपल्याला परळीच्या विकासासाठी मतदान करायचं आहे. मतदानासाठी बाहेर पडा, मी माझं कर्तव्य पूर्ण केलंय, तुम्हीही करा, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
गडचिरोत एक धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीचे कर्तव्य बजावत असताना एका शिक्षकाचा भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अतिसंवेदनशील ठिकाणी पायी जाताना ही घटना घडली आहे.
जालन्यातील अंबडच्या जामखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालं. यामध्ये एक दण जखमी झाल्याचं वृत्त आहे. मतदारांना गाडीत बसून आणल्यानं दोन गटांमध्ये वाद झाला आहे.
बोगस मतदारांवरून बीडमध्ये दोन गटांमध्ये जुंपल्याचं पहायला मिळालं. क्षीरसागर काका पुतण्यांमध्ये जुंपल्याचं दिसून आलं. या ठिकाणी काका पुतणे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. वयाच्या ९७ व्या वर्षीही बाबासाहेब पुरंदरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपलं कर्तव्य पार पाडलं.
सविस्तर वाचा-
गेल्या पाच वर्षांमध्ये मतदारसंघात आमदार दिसले नाहीत. नागरिकांमध्येही रोष आहे. महाराष्ट्राला लागलेली धुळ वाहून जाण्यासाठी आज पाऊस पडत आहे, असं म्हणत अविनाश जाधव यांनी संजय केळकर यांच्यावर टीका केली.
सविस्तर वाचा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन याने मतदानाचा हक्क बजावला.
राज्यात पहिल्या चार तासांमध्ये सरासरी १६.३० टक्के मतदान झालं आहे.
आमच्या समोर उत्तम विरोधीपक्ष असावा, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. त्यामुळे सरकारवर वचक राहत असल्याचंही ते म्हणाले.
सविस्तर वाचा-
राज्यात ७ ते ११ या चार तासांमध्ये सरासरी १२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागांमधील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत असून शहरी भागामध्ये मात्र कमी प्रमाणात मतदान होत असल्याचं चित्र दिसत आहे.
मतदारांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करावं. संपूर्ण महाराष्ट्र आज मतदानासाठी उतरत आहे. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. त्यांनी सहकटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी सिद्धीविनायकाचं दर्शनही घेतलं.

फोटो : प्रदीप दास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी बोलताना त्यांनी, "महाराष्ट्रातील सर्वात मोठा महोत्सव आज आहे, मी सहकुटुंब मतदान केलं आहे, मतदारांनीसुद्धा मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करावं. लोकशाहीत आपण ज्यांना निवडतो त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असतात", असं सांगितलं.
कणकवली - 9.29%
कुडाळ - 3.29%
सावंतवाडी - 8.87%
दापोली 9.5%
गुहागर 7.4%
चिपळूण 6.9%
रत्नागिरी 8.9%
राजापूर 8.3%
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान करण्याआधी राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. राज ठाकरे यांनी या निवडणुकीत विरोधी पक्षासाठी आपल्याला निवडून द्या असं आवाहन जनतेला केलं आहे
“विजयाचा मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तर कॉन्फिडन्स आहे, यश मिळेलच” असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
सविस्तर वाचा
मुंबईमध्ये पहिल्या दोन तासात सरासरी पाच टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तर मुंबई उपनगरात ५.६४ टक्के, कल्याण पूर्व ६.६० टक्के, कल्याण पश्चिम ६.६० टक्के, ठाणे शहर आणि पाचपाखाडीत ६ टक्के, कळवा मुंब्र्यात ४.३८ टक्के, नाशिक जिल्ह्यात ६.५० टक्के, धुळे शहरात २.५ टक्के, धुळे ग्रामीण ४.७४ टक्के, नागपूरमध्ये ६.४५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यत्त केलं. त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदान केलं.
स्वाभिमानी पक्षाचे वरूड मोर्शी मतदारसंघाचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्या गाडीवर आज सकाळी हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांकडून त्यांची गाडी पेटवण्यात आली.
महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा दावा करत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनेला घरचा अहेर दिला आहे.
सविस्तर वाचा -
नोटाला मतदान करण्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोध केला आहे. मतदानानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
सविस्तर वाचा :
पालघर : वाढवण-वरोरमध्ये मतदान केंद्रांबाहेर शुकशुकाट. असल्याचं पहायला मिळालं आहे. दोन तासात एकही टक्का मतदान झालं नाही.
सविस्तर वाचा.
मुंबईत सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी पाच टक्के मतदान झाल्याची नोद करण्यात आली आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यातच शिवाजीनगर येथील विद्याभवन शाळेत रात्रीपासून वीज गायब आहे. अशातच मेणबत्ती लावून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सांगलीत रात्रभर पाऊस, पहिल्या तासात मतदारांची प्रतिक्षा, आठनंतर धीम्या गतीने मतदान सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. औदुंबर दत्त मंदिरात चौथ्यांदा पाणी शिरलं, अंकलखोप पूलावर पाणी, अग्रणीला पूर, कवठेमहांकाळ हिंगणगाव, देशिंग रोड बंद. ग्रामीण भागात ओढे, नाले दुथडी, अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प, मतदानावर परिणाम
सकाळी आठ वाजेपर्यंत मुंबई उपनगरातील कांदिवलीमध्ये ८ टक्के, ऐरोलीमध्ये २ टक्के, केजमध्ये ६ टक्के, कराड उत्तरमध्ये ६ टक्के, गडचिरोलीतील आरमोरेमध्ये ६ टक्के, नांदेडमधील भोकरमध्ये पाच, तर जालन्यातील परतूरमध्ये सहा टक्के, घनसांगवीमध्ये ७.८० टक्के आणि बदनापूरमध्ये ६ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी आपला मतदानाच हक्क बजावला. गोंदिया येथील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं. भाजपाचे उमेदवार गोपाळ अग्रवाल आणि काँग्रेसचे उमेदवार अमर वर्दे यांच्यात या ठिकाणी मुख्य लढत होत आहे.
शत्रू कधीही डंखचं मारतो. तुम्ही असं राहू नका, असं एक वृद्ध महिला मला म्हणाल्या. मी काही गोष्टींमुळे दुखावले आहे. मला कशाची भिती आणि अडचण वाटत नव्हती. काही गोष्टींमुळे मला त्रास झाला, असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. परळीतील नाथ्रात त्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
विद्यमान आमदार आणि ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. ठाण्यातील तीन हात नाका येथील वन विभागाच्या कार्यालयातील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केलं. यावेळी त्यांच्यासमोर मनसेचे नेते अविनाश जाधव यांचं आव्हान असणार आहे.

फोटो- दीपक जोशी
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आपला मतदानाचा हक्क बजावला.यावेळी त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदेही उपस्थित होत्या. सोलापुरातील जागृती विद्या मंदिर नेहरु नगर येथे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
आपल्या हा अधिकार मिळाला आहे. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. लोकशाहीचा आज उत्सव आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. त्यांनी काटेवाडी येथे जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला
Maharashtra: Senior Nationalist Congress Party (NCP)leader Supriya Sule after casting her vote in Baramati. Her cousin and NCP leader Ajit Pawar is contesting against BJP's Gopichand Padalkar from the constituency. #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/unsex40pLC— ANI (@ANI) October 21, 2019
भाजपाचे पनवेलचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
आज राज्यातील २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पुण्यातही मतदारांमध्ये मतदानासाठी मोठा उत्साह पहायला मिळत आहे. सकाळपासूनच मतदारांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.