आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडीओत शीतल म्हात्रे या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रेंनी हा व्हिडीओ मॉर्फ असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या घडामोडींनंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं संबंधित प्रकरणाची दखल घेतली आहे. या व्हिडीओप्रकरणी गृहविभागाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी आणि यामागील नेमकं सत्य समोर आणावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली. त्यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून ही मागणी केली आहे. या ट्विटमध्ये चाकणकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टॅग केलं आहे.

हेही वाचा- शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास एसआयटीकडे, शंभूराज देसाईंची विधानसभेत माहिती

संबंधित ट्वीटमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या, “श्रीमती शीतल म्हात्रे यांच्याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना समाज माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का? हा प्रश्न आहे.”

“राज्यातील महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. श्रीमती म्हात्रे ह्यांच्या व्हिडीओप्रकरणी गृह विभागाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे,” अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra women commission rupali chakankar reaction over sheetal mhatre viral obscene video with mla prakash surve rmm