छत्रपती संभाजीनगर : शासकीय योजनेंतर्गत केलेल्या दोन वेगवेगळ्या कामांचे देयक दोन कोटी रुपये काढल्याचा मोबदला म्हणून प्रत्येकी तीन-तीन टक्के मिळून सहा टक्क्यांनी १२ लाख रुपये लाचेची मागणी करून प्रत्यक्षात सहा लाख रुपये घेताना माजलगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत इंद्रजित चव्हाण यांना गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चंद्रकांत चव्हाण यांच्या माजलगाव येथील निवासस्थानी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून शुक्रवारी चंद्रकांत चव्हाण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

या घटनेतील तक्रारदार ३० वर्षीय आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाच्या नगर उत्थान अभियान योजनेअंतर्गत माजलगाव नगर परिषदेंतर्गत केलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे देयक दोन कोटी काढल्याच्या मोबदल्यात ३ टक्क्यांप्रमाणे सहा लाख रुपये व राहिलेल्या उर्वरित कामांमधील रस्त्याचे बाजूचे अतिक्रमण काढून अडथळे दूर करून देण्यासाठी सहा लाख रुपये, असे एकूण १२ लाख रुपये लाचेची मागणी चंद्रकांत चव्हाण यांनी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तशी लेखी तक्रार संभाजीनगरच्या लाचलुचपत कार्यालयाकडे नोंदवण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने १० जुलै रोजी तक्रारदार व पंच यांच्या समक्ष मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे त्यांचे घरी पिताजीनगरी येथे पाठवून लाचेच्या संदर्भाने पडताळणी केली. तेव्हा चंद्रकांत चव्हाण यांनी तक्रारदार यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा लाख रुपये लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच अंगझडतीत ॲपल कंपनीचा मोबाईल फोन, प्रशासकीय ओळखपत्र आढळून आले. मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून पुढील निरीक्षण, विश्लेषण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे व आरोपी यांची घरझडती प्रक्रिया सुरू आहे, असे सांगण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी केशव दिंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पहिलीच मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांची मागील आठवड्यात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेल्या माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगावात केलेली ही पहिलीच मोठी कारवाई ठरली.