सोलापूर : कोल्हापुरात पत्नीचा चाकूने भोसकून खून करून पलायन केलेला पती सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाल्याची घटना घडली.याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन चंद्रशेखर राजपूत (वय ३३, रा. शिरोळ एमआयडीसी, कोल्हापूर) असे या गुन्ह्यात स्वतः हजर झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो लष्करातील सेवेतून पळून आला आहे. सकाळी तो दुचाकीने सोलापुरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस ठाणे अंमलदारास भेटला.

त्याने कोल्हापुरात शिरोळ एमआयडीसीमध्ये घरी पत्नी शुभांगी हिचा खून करून आल्याचे सांगितले. तेव्हा त्यास ताब्यात घेऊन फौजदार चावडी पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांना घटनेची माहिती कळविली. त्यानुसार कोल्हापूर पोलीस शिरोळ एमआयडीसीतील राजपूत यांच्या घरी गेले असता घराला कुलूप होते.

कुलूप तोडून पाहणी केली असता घरात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. तेव्हा इकडे राजपूत याची सखोल चौकशी केली असता त्याने आपल्या पत्नीला दुचाकीवर बसवून कोल्हापूरकडे येताना वाटेत घाटाजवळ अचानकपणे पत्नीशी भांडण करून चाकूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. नंतर त्याने पलायन करीत दुचाकीवरून सोलापूर गाठले. त्याने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली असता घडलेला प्रकार खरा असल्याचे दिसून आले. त्यास दिवसभर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात निगराणीखाली ठेवून सायंकाळी कोल्हापूर पोलिसांचे पथक आल्यानंतर राजपूत यास त्यांच्या हवाली करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले.