Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या केल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी समोर आले. या घटनेनंतर बीडसह राज्यभरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणी राजकीय नेत्यांकडूनही आरोपींना तात्काळ अटक केली जावी, तसेच त्यांना कठोरता कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे. यादरम्यान संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी आज मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यादरम्यान माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी हत्या करणारे आरोपी आणि त्यांना पाठीशी घालणारे नेते या दोघांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे म्हणाले की, “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, समाजाने त्यांना आधार द्यावा. सगळे त्यांच्या पाठीशी आहेत. शेवटी सरकार जनता आहे. भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आपला मराठा समाज सक्षम आहे. तुम्ही काळजा करू नका”.

“देशमुख कुटुंब एकटं नाही. समाज खरोखर पाठीशी आहे. सरकार किती दिवसात करतं ते पाहत आहे. एकदा जर समाजाला वाटलं की सरकार दिशाभूल करत आहे त्या दिवशी तुम्हाला हे राज्य बंद पडलेलं दिसेल. कारण तुम्ही गुंडगिरी करणार्‍याला, फरार आरोपीला पोसताय का? पळून जाण्यासाठी मदत करत आहात का? यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्यातील आणि बाहेरच्या सगळ्या यंत्रणांना गृहमंत्रालयाने सांगितले पाहिजे. ज्यांनी लपवून ठेवले आहे त्यांना देखील तुरूंगात टाकलं पाहिजे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांना कुणी-कुणी मदत केली याचे देखील सीडीआर काढून त्यांना देखील सहआरोपी करून गुन्हे दाखल केले पाहिजे. फक्त खंडणीपुरते ठेवता कामा नये. खंडणीमुळे यांनी आमच्या माणसाला मारून टाकलं आहे. त्यांना सुट्टी नाही. समाज पाठीशी आहे. थोड्याच दिवसात संपूर्ण राज्य ढवळून निघेल आणि संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू होईल”, असेही मनोज जरांगे म्हणाले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी तात्काळ अटक करावी अशी सरपंच संघटनेची मागणी आहे आणि यासाठी तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल विचारले असता जरांगे म्हणाले की, “ही रास्त मागणी आहे. अटक करण्यासाठी ग्रामपंचायती बंद ठेवण्याची वेळ आली हे सरकार आहे की काय? तुम्ही न्यायच द्यायचा नाही हे ठरवलं आहे का? आमच्याकडे अमके मंत्री आहेत, आमच्या सरकारमध्ये आहेत म्हणून आम्हाला ते करता येत नाही… तुमचा भाऊ असता तर? तुमच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर असं झालं असतं तर? मग तुम्हाला किती वाईट वाटलं असतं”.

हेही वाचा>> संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”

“त्यामुळे या लेकराला राज्याचा मुलगा सरकारने समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये. अन्यथा जनता रस्त्यावर येणार आहे. राज्य बंद पडणार. तुम्ही आरोपीला पाठीशी घालत आहात, त्याच्या बाजूने बोलत आहात हे सगळं चुकीचं आहे. आरोपीला साथ देणारे मंत्री तुमच्याबरोबर चहापाणी करतात बिस्कीटं खातात”, असेही मनोज जरांगे यावेळी म्हणाले.

“क्रूर हत्या घडवून आणली त्या आरोपीलाही सोडलं नाही पाहिजे, त्याच्या पाठीशी असलेल्या नेत्यालाही सोडू नये. आणखी दोन-तीन मुख्य आरोपी फरार आहेत. या १०-२० जणांना साथ देणारा कोण? मग तो खासदार, आमदार असो तो देखील शोधा. आतापर्यंत कोणता विषय घेतलेलाच नाही, तरी काही लोक जाणून बुजून त्याचं नाव नाही असं म्हणत आहेत. त्याचं नाव नाही म्हणणारे तु्म्ही कोण? मदत करणारे सगळे यामध्ये आले पाहिजेत अन्यथा सरकारला सोपं जाणार नाही”, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange demand govt to arrest who accused in santosh deshmukh murder case walmik karad marathi news rak