Manoj Jarange Patil On Vijay Wadettiwar: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. यातच राज्य सरकारने २ सप्टेंबरमध्ये एक जीआर काढला. मात्र, त्या जीआरनंतर ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली, तसेच ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं की ‘मनोज जरांगेंच्या हाती बंदूक द्या आणि ओबीसींचा खात्मा करा.’ त्यांच्या या विधानावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली. ओबीसींच्या नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता त्यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, “विजय वडेट्टीवार हे ओबीसींच्या ३७४ जाती म्हणत आहेत. मात्र, खऱ्या ओबीसींच्या जाती त्यांनी संपवल्या आहेत. यावर ओबीसींनी चिंतन केलं पाहिजे. ३७४ जाती खऱ्या अर्थाने कोणी संपवल्या या विजय वडेट्टीवारांच्या विधानावर ओबीसींनींच विचार केला पाहिजे. कारण ओबीसींना यांनी खोटं आणि बोगस आरक्षण दिलं, ओबीसींचा खरा घात कोणी केला असेल तर येवल्याच्या आलीबाबांनी आणि विजय वडेट्टीवार व त्यांचे जे कोण कोण नेते होते त्यांनी घात केला”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“त्यांना माहिती होतं की १४ टक्के आरक्षण हे मंडल आयोगाने ओबीसींना दिलं. मग १६ टक्के आरक्षण हे मराठ्यांचं आहे, हे मराठ्यांच्या नावावर असतानाही ओबीसींना दिलं. याचा अर्थ खऱ्या अर्थाने ओबीसींची खरी फसवणूक ओबीसी नेत्यांनींच केली. कारण आमचं १६ टक्के आरक्षण आम्हाला परत मिळणार आहे. ज्यांनी आरक्षण दिलं त्यांचा उपकार ओबीसी नेत्यांना नाही. आमचं १६ टक्के आरक्षण ओबीसींना देणाऱ्यांनी आमचं वाटोळंच केलं. उदाहरणार्थ शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, पण ज्या शरद पवारांनी यांना (ओबीसींना) आरक्षण दिलं त्यांचा देखील त्यांनी उपकार ठेवला नाही”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
वडेट्टीवरांच्या विधानावर जरांगे काय म्हणाले?
“तो प्रयोग त्यांना करायचा आहे. येवल्यावाल्याचे ते शब्द परळीच्या टोळीने घेतलेत. आता नवीन एक भिडू त्यांना भेटला. विजय वडेट्टीवार यांच्या तोंडून ते फक्त वधवून घेत आहेत. कारण तलवारीची, कोयत्याची, दांड्यांची, बंदुकीची भाषा ही त्यांची आहे. त्यांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत. हा त्यांचा प्रयोग आहे. पण आम्ही गोरबरीब ओबीसींना जीव लावतो.कारण आम्ही उलट्या काळजाचे नाहीत. पण काहींनी राजकीय स्वार्थासाठी ओबीसीच डावावर लावले आहेत. जे आता स्वत:ला ओबीसी नेते समजत आहेत त्यांनी ओबीसी संपवण्याचा घाट घातला आहे”, असंही जरांगे म्हणाले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
“एका समाजाला सर्व काही पाहिजे. ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसईबीसी असं सर्व काही एकाच समाजाला पाहिजे. त्यांना सारथी मधूनही फायदा पाहिजे. महाज्योती मधूनही फायदा पाहिजे. मग बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी जगायचं की नाही? मनोज जरांगे यांना सांगून टाका की ३७४ जातींना समुद्रात बुडवून मारून टाका म्हणावं. समजाच्या ताकदीच्या जीवावर जी सत्तेची दादागिरी आहे आणि हे योग्य नाही. मराठा समाजाच्या ताकदीच्या जीवावर जर आम्हाला धमकावत असतील तर त्यांना म्हणावं की बंदूक आणि तलवारींनी छाटून टाका आमच्या सगळ्यांची मुंडके, म्हणजे जरांगे पाटलांचं समाधान होईल”, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.