मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ओबीसी नेत्यांची बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यानंतर याबाबत मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे.सरकारने आज घेतलेली बैठक ही पूर्णपणे मॅनेज केलेली बैठक. जातींमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, मराठ्यांना आरक्षण मिळू न देण्यासाठी ही बैठक घेण्यात आली असा आरोप मनोज जरांगेंनी केला.

काय म्हटलं आहे मनोज जरांगेंनी?

“कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी होणार असेल तर मंडल आयोगाने दिलेलं १४ टक्के आरक्षणही घालवलं पाहिजे. वरचं तर बोगस आहेच. त्यात काही दुमत नाही. मराठे त्याबद्दल गप्प आहे. त्याच्यावरचं १६ टक्के आरक्षण बोगस असतं, सरकार एका बाजूने बोलणारं नसेल तर दूध का दूध आणि पानी का पानी केलं जाईल. श्वेतपत्रिका काढतील त्याचीही. १४ टक्क्यांचं १६ टक्के आणि त्यानंतर ५२ टक्के कसं झालं? १४ टक्के आरक्षणही रद्द करा हीपण आमची मागणी आहे. मंडल आयोगाने आरक्षण दिलं तेव्हा सर्व्हे, जातनिहाय जनगणना सगळं केलं असेल. ओबीसींची यादीही तयार असेल. जनगणना त्यांनी स्वतः केली की इंग्रजांची घेतली. जर खोटं असेल तर ते १४ टक्के आरक्षणही रद्द झालं पाहिजे. इंग्रजांची जनगणना खरी आणि आमची १८८४ च्या मराठ्यांच्या नोंदी खोट्या असं कसं चालेल?” असा प्रश्न मनोज जरांगेंनी विचारला.

मराठ्यांचं वाटोळं होईल अशी मागणी तो करतो

“बाकीच्या संस्थांना फायदा मिळतोय तसं सारथीतून सगळ्यांना फायदा मिळाला हे आम्हीही सांगितलं. छगन भुजबळचं काय बोलायचं? तो काहीही रद्द करा म्हणतोय. त्याने सगळ्या जाती एकमेकांच्या अंगावर घातल्या आहेत. तो म्हणतोय रद्द करा हा जातीयवाद नाही का? सगे-सोयऱ्यांची अंमलबजावणीत ओबीसी बांधवांचाही फायदा होणार आहे. ते तो रद्द करा म्हणतोय. याची मागणीच अशी असते ज्यात काही तथ्य नसतं. मराठ्यांचं वाटोळं होईल अशी त्याची (छगन भुजबळ) एक तरी मागणी असतेच. मराठ्यांच्या मागण्यांना विरोध करायचा हा भुजबळांचा धंदाच झाला आहे.” अशी टीका मनोज जरांगेंनी केली.

OBC Reservation : ओबीसी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक, राजकीय घडामोडींना वेग

मी १० महिन्यांपासून सगळ्यांचा आदरच करतोय

“लक्ष्मण हाके आत्ता सगळ्यांचा आदर करत आहेत, मी १० महिन्यांपासून आदरच करतो आहे. मी सगळ्यांचा सन्मानच राखला आहे. मी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय आणि तुम्ही मिळू नये म्हणून भांडत आहात. ब्र शब्दाने मी कुणाला दुखावलं नाही. त्या एकट्याला (भुजबळ) सोडून. जातीयवाद होऊ नये यासाठी एकत्र बसायचं जर सरकार आणि ओबीसींमध्ये ठरलं असेल तर आम्हीही तयार आहोत. आम्हाला कुठे जातीयवाद करायचा आहे?” असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

आज झालेली बैठक मॅनेज बैठक होती

छगन भुजबळ काय सांगतो आमचा काही त्याच्यावर भरवसा नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध कसं करायचं? सिद्ध करावं लागेलच. आमचं म्हणणं आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत. तुमचं म्हणणं आहे नाही. नाही तर तसं सिद्ध करुन द्या आम्हाला. आहेत कसे आम्ही सांगतो. मी आंदोलन लावून धरलं, समाजाने आंदोलन लावून धरलं. त्यानंतर नोंदी निघाल्या, तसं तुम्ही सिद्ध करा. मराठा-कुणबी एकच आहेत मी सिद्ध करतो. ही जी बैठक झाली ती मॅनेज केलेली बैठक होती. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी ठरवून बैठक घेण्यात आली. मराठ्यांना सगे सोयऱ्यांचं आरक्षणही द्यायचं नाही, सारथीच्या योजनाही द्यायच्या नाहीत. महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही ही मराठाविरोधी ठरवून बैठक होती. असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. सरकारमधल्या मंत्र्यांनी ज्यांनी मराठ्यांच्या द्वेषापोटी आंदोलन बसवलं त्यांनीच ही बैठक बसवली होती असाही आरोप जरांगेंनी केला.