भाजपा म्हणजे आपलं घर आहे. मी स्वत: भाजपाचा आणि पंतप्रधान मोदींचाही भक्त आहे, असे वक्तव्य करणारे मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते. महेश कोठारे अशीच वक्तव्यं करत राहिले तर तात्या विंचू येऊन त्यांना चावेल, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. ज्यानंतर आता महेश कोठारेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

मुंबईत भाजपाचा महापौर होईल, असे विधान केल्याबद्दल संजय राऊत यांनी महेश कोठारेंवर टीका केली. ते म्हणाले, “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात, तुमचे सिनेमे फक्त भाजपाच्या लोकांनी पाहिलेले नाहीत.” संजय राऊत पुढे गंमतीत म्हणाले, तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.

महेश कोठारेंनी संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत काय प्रतिक्रिया दिली?

मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केले. संजय राऊतांनी जे म्हटलं, ते त्यांचं मत होतं. त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, असे म्हणत महेश कोठारे जोरदार हसले. संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. पण मी माझं मत मांडले. मी या मतावर ठाम आहे. माझं मत निर्विवाद आहे. संजय राऊत यांचाही मी खूप आदर करतो. पण माझं मत हे माझं मत आहे, असं म्हणत महेश कोठारे हे पुन्हा एकदा हसत सुटले. महेश कोठारे यांनी एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिली आहे. महेश कोठारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांच्याशी वाद घालणे टाळले. मात्र, आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही कोठारे यांनी म्हटलं आहे.

महेश कोठारे यांनी टाळला वाद

महेश कोठारे यांनी मागाठाणे या ठिकाणी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात भाजपा आणि मोदींबाबत विधान केलं होतं. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपाचे नेते उपस्थित होते. दरम्यान संजय राऊत यांना जेव्हा याबाबत प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी तात्या विंचूचं नाव घेत महेश कोठारेंवर टीका केली. मात्र महेश कोठारे यांनी या टीकेला उत्तर देण्याऐवजी हसत हसत आपण जे बोललो ते आपलं मत आणि राऊत जे म्हणाले ते त्यांचं मत अशी प्रतिक्रिया दिली.