सातारा : टाळ-मृदंगांच्या गजरात, माउलींच्या जयघोषात, विठुरायाचे नाम घेत पंढरीच्या ओढीने दरमजल करीत निघालेला संत ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचा लाखो वैष्णवांचा मेळा शनिवारी श्रीरामाच्या फलटणनगरीत विसावला. शहरात पालखी दाखल होताना तिचे स्वागत आणि माउलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक शहराच्या वेशीवर आले होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारी तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामी होता. आज सकाळी पंढरीच्या ओढीने निघालेली ही वैष्णवांची वारी दरमजल करत फलटणच्या दिशेने निघाली. मार्गावरील गावोगावचे स्वागत स्वीकारत सोहळा पुढे सरकत होता. टाळ-मृदंगांचा गजर, माउलींचा जयघोष, विठुरायाच्या नामस्मरणात हजारो वारकरी दंग झालेले होते.
‘साधन संपत्ती हेंचि माझें धन,
सकळ चरण विठोबाचें,
शीतळ हा पंथ माहेराची वाट,
जवळीच नीट सुखरूप,
तुका म्हणे केव्हां देखेन कळस,
पळाली आळस निद्रा भूक’
‘शीतळ हा पंथ’… तुकाराम महाराजांनी सांगितलेला हा एक मार्ग आहे. जो शांती आणि सुखाची वाट दाखवतो. हा अभंग म्हणत वारकरी पंढरीची वाट चालत होते. माउलींच्या नामघोषात हा संतभार शनिवारी सायंकाळी पाच वाजता फलटणनगरीत पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत आणि माउलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक शहराच्या वेशीवर आले होते. माउलींचा सोहळा पोहोचताच टाळ-मृदंगांचा एकच गजर झाला. तसेच माउलींच्या जयघोषाने फलटणनगरी दुमदुमून गेली.
‘आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग’ असे भाव मनाशी बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकरी भाविक पालखी सोहळ्यात पंढरीच्या ओढीने सहभागी झाले आहेत. त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. माउलींचा रथ विविध रंगांच्या फुलांनी आकर्षक सजविण्यात आला होता. त्यामुळे पालखी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
महानुभाव आणि जैन धर्मीयांच्या दक्षिण काशीत फलटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सायंकाळी पाच वाजता प्रशासनाच्या वतीने फलटण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी माउलींचे स्वागत केले. यावेळी सोहळ्यातील मानकरींचा सत्कार करण्यात आला. माउलींचा पालखी सोहळा शहरातील जिंती नाका, हरिबुवा मंदिर, पाचबत्ती चौकमार्गे ऐतिहासिक श्रीराम मंदिराजवळ आल्यानंतर तेथे श्रीराम देवस्थान ट्रस्ट आणि नाईक निंबाळकर राजघराण्याच्या वतीने माउलींचे स्वागत करण्यात आले.
पुढे पालखी सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक गिरवी नाकामार्गे विमान तळावर मुक्कामासाठी विसावला. यानंतर पालखी तळावर वारकरी भाविक, आजूबाजूच्या गावातून आलेले ग्रामस्थ, फलटणचे नागरिक यांच्या उपस्थितीत समाज आरती करण्यात आली. वारकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यानंतर दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या.
फलटण पालिकेने वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोठी व्यवस्था केली आहे. पालखी तळावर आरोग्य विभागामार्फत छोटे तात्पुरते दवाखाने तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी हिरकणी कक्ष आणि वारकऱ्यांसाठी डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले आहेत.