Meghana Bordikar Threatens Govt Officer : देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री व आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये चालूच आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, नितेश राणे, संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ आता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्यानंतर थेट विधीमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेच्या कामकाजावेळी सभागृहात मोबाइलवर रमीचा डाव (पत्त्यांचा खेळ) खेळण्यापर्यंत हिंमत केली. परिणामी त्यांची कृषीमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांना तुलनेने दुय्यम दर्जाचं क्रीडामंत्रिपद देण्यात आलं आहे. आता मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत बोलत असताना ग्रामसेवकाला कानशीलात लगावण्याची धमकी दिली आहे.
परभरणी जिल्ह्यातील जिंतूरमधील बोरी गावात एका कार्यक्रमात बोलत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कठोर शब्दांत सुनावलं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला दमदाटी करत असून कानाखाली मारण्याची धमकी देत असल्याचं व्हिडीओत दिसतंय.
…तर कानाखाली मारेन : मेघना बोर्डीकर
व्हिडीओमध्ये दिसतंय की मेघना बोर्डीकर एका अधिकाऱ्याला उद्देशून म्हणत आहेत की “तुम्हाला पगार कोण देतंय? तुमची ही चमचेगिरी चालणार नाही. हे प्रकार बंद करा, नाहीतर तुम्हाला आत्ताच्या आत्ता बडतर्फ करून टाकेन. याद राखा तुमचा जो कारभार चाललाय तो मला माहिती आहे. म्हणून मुद्दाम मी इथे सीओ मॅडमना बोलावलं आहे. चमचेगिरी करायची असेल तर नोकरी सोडून दे. याद राख हा मेघना बोर्डीकरचा शब्द आहे, चमचेगिरी केली तर कानाखाली मारेन.”
“लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी राग व्यक्त केला” राज्यमंत्री बोर्डीकरांकडून स्पष्टीकरण
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवरून विरोधकांकडून टीका होत असताना मेघना बोर्डीकर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या, “मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या भगिनी भर कार्यक्रमात ग्रामसेवकाची तक्रार करत असतील तर हा त्रागा, राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी व्यक्त झाला आहे. जिल्ह्याची पालक या नात्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकाला दिलेली ही समज आहे. सामान्य जनतेला त्रास देवू नका. तसेच कृपया, अर्धवट माहितीवरून जनतेची दिशाभूल करणारे ट्वीट करणे बंद करा.”
मंत्री संजय शिरसाट यांचे आणखी एक वादग्रस्त
‘वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटी रुपयांचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातायं?” असं वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी (२ ऑगस्ट) अकोला येथे केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.