रायगड, ठाणे – पालघर मधील वाढवण बंदरापाठोपाठ रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर विकासाला चालना देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे स्थापत्य विभागीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. दिघी बंदर आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र विकासासाठी या विभागीय कार्यालयाच्या कार्यरत असणार आहे.
एमआयडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिघी बंदर औद्योगिक क्षेत्रासाठी नव्याने स्थापत्य विभागाचे विभागीय कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार माणगाव येथे हे विभागीय कार्यालय सुरू होणार आहे. त्यासाठी आवश्यक दिल्ली मुंबई कॉरिडोर प्रकल्पाअंतर्गत दिघी बंदर लगून असलेल्या परिसरात औद्योगिक क्षेत्र विकसित केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ४६२ हेक्टरचे भूसंपादन करण्यात आले आहे. यातील ४ हजार ११ हेक्टरवरील क्षेत्राचा एमआयडीसी मार्फत विकास केला जाणार आहे. यात प्रामुख्याने पादत्राणे व चर्मोद्योग समुह विकास प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश असणार आहे. यातील ६१.९७ हेक्टरवर पादत्राणे आणि चर्मोद्योग क्लस्टर प्रकल्पाची तर १ हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्कची उभारणी होणार आहे. तर उर्वरित २ हजार ४६० हेक्टरवर केंद्रीय औद्योगिक कॉरिडोर विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगीक क्षेत्र विकसित केले जाणार आहे.
त्यामुळे या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी एमआयडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. एमआयडीसी मार्फत या परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी पुढील आठ ते दहा वर्षात चार हजार कोटींची कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामांसाठी माणगाव मधील विळेभागाड येथे स्थापत्य विभागाचे विभागीय कार्यालय सुरू करण्यात एमआयडीसीने मंजूरी दिली असून आहे. त्यामुळे पालघर मधील वाढवण बंदरापाठोपाठ दिघी बंदर आणि दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान या वृत्ताला एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असला तरी अधिकृत प्रतिक्रीया देण्यास नकार दिला आहे.