रत्नागिरी – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड उद्योग सुरू न करताच ताब्यात ठेवल्याने अशा १२० उद्योजकांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आले आहेत या नोटीसमध्ये उद्योग सुरू करा अथवा जमिनी परत करा अशा सक्त सूचना देण्यात आले आहेत या या नोटीसमुळे उद्योजकांमध्ये चांगलेच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी उपलब्ध करून दिलेले भूखंड वर्षानुवर्षे पडून ठेवून उद्योग सुरु न करणा-या उद्योजकांविरुद्ध महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कठोर भूमिका घेत अशा उद्योजकांना कायदेशीर नोटीसा पाठवल्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२० उद्योजकांना “उत्पादन सुरू करा, किंवा भूखंड परत करा” अशा स्वरूपाची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.
एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी बंदना करमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक भूखंडाचा गैरवापर करणाऱ्या उद्योजकांसमोर निर्धारित मुदतीत कारखाना सुरू करणे किंवा भूखंडाची परतफेड करणे असे दोनच पर्याय उरले आहेत. सवलतीच्या दरात जमिनी देऊनही दहा वर्षांहून अधिक काळ उत्पादन सुरू न करणाऱ्या उद्योजकांवर एमआयडीसीने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक औद्योगिक वसाहतींमध्ये येथील भूखंडांवर कारखाने उभे राहत नसल्याने विकासाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याकडे औद्योगिक महामंडळाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आहे. याविषयी केलेल्या तपासणीत काही उद्योजकांनी केवळ गुंतवणुकीच्या उद्देशाने भूखंड ताब्यात ठेवले असल्याचे समोर आले आहे. मात्र यामुळे प्रत्यक्ष उद्योग उभारण्यास इच्छुक असलेल्या नव्या उद्योजकांना जमीन मिळणे कठीण झाले होते आणि औद्योगिक विस्ताराची प्रक्रिया ठप्प झाली होती.
भूखंडाचे वाटप झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांच्या आत उत्पादन सुरू करणे बंधनकारक असल्याचा नियम आहे. मात्र, या १२० उद्योजकांनी तब्बल दहा वर्ष उलटून सुध्दा कोणतीही प्रगती न दाखविल्याने, अनेकदा पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने एमआयडीसीने हे अंतिम पाऊल उचलले आहे. दिलेल्या मुदतीत उत्पादन सुरु न केल्यास किंवा समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास भूखंडाचे वाटप रद्द करण्यात येणार असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे. एमआयडीसीने घेतलेल्या या भूमिके नंतर उद्योग विकासाला या दोन्ही जिल्ह्यातून चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.
