येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा राज्यातील मोठ्या प्रमाणात भरणारी यात्रा म्हणून यशस्वी यात्रा ठरली आहे. यंदा श्री येडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरली असून देवीच्या यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम आज बुधवारी दि .२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी राज्यासह बाहेर राज्यातील पंधरा लाखांच्या वर भाविक येरमाळा नगरीत दाखल झाले होते. येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरावरुन स. ८ वा निघाली. बाजार चौकात सकाळी १० वा. पालखीचे आगमन झाल्यानंतर पुष्पहारांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. चुन्याच्या रानात स. ११ वा पालखीचे आगमन होताच लाखो भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर टाकत आई राधा उदे उदेचा एकच जय घोष केला. भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.

आज सकाळी ८ वा. येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन पाच दिवस चालणाऱ्या आमराई मंदिराकडे हालगी, जहांज, संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली. मुख्य चुन्याच्या रानात पालखी ११ वा. येताच भाविकांनी आई राधा उदे उदे, येडुसरीचा उदे उदेच्या जयघोष करताच चुन्याच्या रानाचा परिसर भाविकांच्या गजराने दणाणून निघाला. श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रेनंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्यानंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो. चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर, शेतमजूर, बिगारी, चाकरमाने कर्मचारी, लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी, भाविक राज्यभरातून न चुकता दरवर्षी चुना वेचण्यासाठी दाखल होतात. काळानुरुप या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या प्रतिवर्षी वाढतच गेल्याने आता ती लाखोंच्या संख्येवर पोहचली आणि श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी यात्रा असा मान प्रशासन स्तरावर आल्याने यात्रा पार पाडण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आली आहे.

हेही वाचा – माघारीची चूक केली असती तर, सांगली बिनविरोध झाली असती – विशाल पाटील

श्री येडेश्वरी देवीच्या चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला वेगळे महत्व असुन यात्रेत या दिवशी येणाऱ्या पालखीवर चुन्याच्या रानात पालखी येताच चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकण्यासाठी लाखो भाविकांची झुंबड उडते, त्यामुळे भाविकांची आपले चुन्याचे खडे पालखीवर पडावे यासाठी स्पर्धाच लागली आहे की काय असे चित्र दिसत होते. यात्रेत भाविकांनी वेचलेला चुना गोवऱ्याची भट्टी लावून भाजला जातो. यात्रेनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी देवीचे मंदिर चुन्याने रंगवले जाते त्यामुळे यात्रेत चुना वेचण्याची प्रथा रुढ झाल्याचे जाणकारांचे मत आहे. ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आली असून चुन्याच्या रानात पालखी येताच चुनखडीचे कडे आपोआप रानात येतात असे लोक सांगतात पूर्वीच्या तुलनेत चुन्याच्या रानात लोकवस्ती वाढली असली तरी दरवर्षी भाविकांच्या हाती चुनखडी कशी येते ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली आजपर्यंत ही प्रक्रिया लुप्त का झाली नाही, चुन्याचे खडे आपोआप वर येतात यावर देवी येडेश्वरी जागृत देवी असण्याचा भाविकांना विश्वास येतो त्यामुळेच भाविकांची तोबा गर्दी होते. यात्रेचे स्वरुपही यामुळेच वाढले आहे.

चुन्याच्या रानातून देवीची पालखी १२.३० वा. आमराई मंदिरातील पालखी मंदिरात पोचली. येथेही पालखी दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी पोलीस प्रशासनाने विविध उपाययोजना आखून तगडा बंदोबस्त केला होता. आज पालखी मुख्यमंदिरातून पोलीस प्रशासनाच्या कमांडो, दंगल नियंत्रण पथक, देवस्थान स्वयंसेवक, स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात निघाल्याने सुरक्षितपणे पालखी मिरवत आली. यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, देवस्थानचे पुजारी, मानकरी, खांदेकरी पालखी सोबत होते. पालखीच्या दर्शनासाठी ओमप्रकाश राजेनिंबाळकर, राणाजगजीतसिंह पाटील, कैलास पाटील, मनोज जरांगे पाटील उपस्थित होते.

भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठीक ठिकाणी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली होती. भारतीय स्टेट बँकेच्या वतीने थंड आरओ पाण्याच्या पानपोईची व्यवस्था करण्यात आली होती.

देवीच्या पालखीचे आज चैत्र पोर्णिमा यात्रेनिमित्त आमराई मंदिराकडे आगमन होणार असल्याने स्थानिक भविकात मोठा उत्साह होता. पालखीच्या स्वागतासाठी गावातील महिला भाविकांनी बाजारचौक, वाणीगल्ली, रोकडेश्वर मारुती मंदिर चौक, छत्रपती मार्केट, संभाजी नगर रस्त्यावर मोठंमोठ्या रांगोळी,फुलांच्या रांगोळीची सजावट केली होती.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अपयशाचा अंदाज आल्याने मोदींची जीभ घसरतेय – पृथ्वीराज चव्हाण

सोमवारी पहिल्या पोर्णिमेपासूनच भाविक लाखोंच्या संख्येने येरमाळ्यात दाखल होत होते. भाविकांची विक्रमी संख्या दाखल झाल्याने प्रत्येकाच्या हाती असलेले प्रत्येक कंपनीचे स्मार्ट फोन कव्हरेज मिळतं नसल्याने शोभेची वस्तू ठरले. यामुळे २२ तारखेच्या दुपारपासून २४ तारखेच्या ५ वाजेपर्यंत ऑनलाइन खरेदी, विक्री व्यवहार सर्व्हर डाऊन असल्याने बंद राहिले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचीही वृत्तसंकलन करताना मोठी अडचणी येत होत्या.

यंदाची यात्रा म्हणजे भाविकांच्या जमलेल्या अलोट गर्दीने आजपर्यंतचे विक्रम मोडीत काढणारी यात्रा ठरली. चुना वेचाण्याच्या कार्यक्रमानंतर परत फिरलेल्या भाविकांच्या वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते बीडपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याने विस्कळीत सेवा झाली होती. रात्री ८ वाजेपर्यंत या रस्त्यावरील भरधाव वाहतूक संथगतीने चालू होती.