राहाता : किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन परस्परांवर दगडफेक झाल्याने कोपरगावमध्ये तणावाचे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली. त्यात २ पोलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना कोपरगावच्या मोहनीराजनगर भागात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परस्परविरोधी फिर्यादीनुसार पोलिसांनी दोन्ही गटांतील ६३ जणांवर गुन्हे दाखल केले व दोन्ही बाजूंच्या १६ आरोपींना अटक केली. या आरोपींना गुरुवारी कोपरगाव न्यायालयाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांची कुमक कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली. नंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. पोलीस कर्मचारी श्री. भांगरे व श्री. सुंबे जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी आज घटनास्थळी भेट दिली. राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. याबाबत विवेक राजेंद्र आव्हाड (रा. निमगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की मध्यरात्री कुटुंबासह मोटारीतून घरी जाताना खंडोबा मंदिराजवळ जमावाने गाडी अडवून क्रिकेटचा स्टॅम्प व लोखंडी रॉडने त्यांना, पुतण्या, आई आणि बहीण यांना मारहाण केली. आईच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे गंठण तोडून नेले. सोडविण्यासाठी आलेला भाऊ सूरज कैलास आव्हाड, गौरव मोरे, अविनाश गिते यास मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याच्या उद्देशाने कुटुंबावर दगडफेक केली. त्यानुसार पोलिसांनी ३५ ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विरुद्ध बाजूने सुनील योगेश गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की रात्री ११ च्या सुमारास आई कल्पना, तसेच सोनू आव्हाड, शुभम आढाव आणि सागर पंडोरे यांच्या समवेत दांडिया कार्यक्रमासाठी मोटारीतून जाताना कट लागल्याच्या कारणावरून जमावाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने दगडफेक करत लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केली, तसेच चुलती वनिता नारायण गोरडे हिची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन तोडून नेली. याप्रकरणी पोलिसांनी २३ जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली. कोपरगावचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने, दीपक रोठे आदींनी परिस्थिती नियंत्रणात आणली. तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे घटनास्थळी तळ ठोकून होते. दोन्ही गटांत राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जमा झाला होता.