सांगली : अल्प गतिमंद आई आणि तिचे चार वर्षांचे मूल. माय-लेकराची ही जोडी काही कामानिमित्त मिरजेत आली. बस स्थानकावरून परतीच्या प्रवासात निघायचे तोच खेळता खेळता त्यांची ताटातूट झाली. अल्प गतिमंद असलेल्या आईलादेखील काही आठवेना. ती गावी निघाली. तोवर इकडे आईपासून दुरावलेले मूल मात्र कासावीस होऊन आईला शोधत रडू लागले. पोलिसांनी त्याला बरोबर घेऊन आईचा शोध सुरू केला. तब्बल चार तास मिरजेपासून ते तालुक्यातील गावापर्यंत शोधयात्रा राबवल्यावर माय-लेकराची गळाभेट झाली अन् पोलिसांचे श्रम सार्थकी लागले.
मिरज बस स्थानकावर सोमवारी सायंकाळी सहा वाजता एक लहान मुलगा आईशी चुकामूक झाल्याने सैरभैर होऊन रडत असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ हालचाल करत पोलीस पथक धाडले.उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांनी पथकासह स्थानकावर धाव घेऊन मुलाला ताब्यात घेतले. मात्र, त्याला नाव, गाव काहीच सांगता येईना. आईविना पोरक्या झालेल्या लेकराची नजर आईला धुंंडाळत होती. अखेर उपनिरीक्षक श्रीमती गायकवाड, पोलीस कर्मचारी साक्षी पतंगे, अभिजित धनगर, नाना चंदनशिवे, मोहसीन टिनमेकर, जावेद शेख यांनी स्थानकातील चलचित्रीकरण तपासले. एका महिलेसोबत हा मुलगा बस स्थानकावर आल्याचे चित्रित झाले होते. पण महिलेबाबत अधिक माहिती मिळत नव्हती.
स्थानकाबाहेर काही सीसीटीव्ही तपासले असता, महिला दर्ग्यात दर्शनाला जाऊन आल्याची माहिती मिळाली. या आधारे ग्रामीण भागात त्या वेळी रवाना झालेल्या बसची माहिती घेतली असता संबंधित महिलेला घेऊन एक बस सोनी (ता. मिरज) गावात गेल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने सोनी गाव गाठले. गावात चौकशी केली असता महिलेची माहिती मिळाली. त्या महिलेच्या घरी पोहोचताच हरवलेले मूल धावत जाऊन आईच्या कुशीत विसावले. मूल सापडल्यापासून तब्बल चार तास विविध माध्यमांतून पोलीस त्या मुलाच्या आईचा शोध घेत होते. अखेर तिचा शोध लागला. त्या माय-लेकरांची गळाभेट अनुभवताच श्रम सार्थकी लागल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली.