दापोली: महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धेमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गुणवान क्रिकेट पटूना राष्ट्रीय स्तरावर येण्यासाठी संधी मिळणार असून या स्पर्धेमुळे भविष्यात भारतालाही गुणवान क्रिकेट पटू मिळणार आहेत. सलग तिसऱ्या वर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघांच्या मालकांचा मोलाचा वाटा असल्याचे उदगार महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी काढले.

दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात पार पडलेल्या  पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मानद सचिव अॅड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फील्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे चेअरमन  सचिन मुळे, तसेच अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, राजू काणे,  सुनील मुथा,  विनायक द्रविड,  सुशील शेवाळे,  रणजीत खिरीड, सीईओ  अजिंक्य जोशी, तसेच सर्व संघमालक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

यावेळी रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्र प्रीमियर लीग हा केवळ एक स्पर्धात्मक मंच नसून, एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, टेक्निकल टीम आणि सपोर्ट स्टाफ यांचे परिश्रम या यशामागे आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात व तळागाळात क्रिकेटचा प्रचार व प्रसार व्हावा, होतकरू व गुणी खेळाडूंना आपले टॅलेंट दाखवण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या या स्पर्धेच्या यशात सर्व संघमालकांचा मोलाचा वाटा आहे. आमचा दृढ विश्वास आहे की,  येत्या काळात एमपीएल देशातील सर्वात लोकप्रिय आणि व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांमध्ये अग्रस्थानावर असेल.” असे पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) व विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) २०२५ साठीचा खेळाडू लिलाव १७ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथे मोठ्या जल्लोषात पार पडला. या लिलावाद्वारे राज्यभरातील उदयोन्मुख आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले आहे.या वर्षीच्या लिलावासाठी ४०९ पुरुष खेळाडू आणि २४९ महिला खेळाडू नोंदणीकृत होते, ज्यामधून संघमालकांनी आपापल्या संघाचा बॅलन्स व गरजांनुसार संघासाठी खेळाडूंची निवड केली.

पुरुष विभागात रजनीश गुरबानी या वेगवान गोलंदाजावर पिबिजी कोल्हापूर टस्कर्स संघाने सर्वाधिक रुपये ५,२०,००० ची बोली लावून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. महिला विभागात तेजल हसबनीस यांच्यावर पुष्प सोलापूर संघाने रुपये ४,४०,००० ची सर्वाधिक बोली लावली.या हंगामात एमपीएल मध्ये ६ संघ आणि डब्लूएमपीएल मध्ये ४ संघ सहभागी झाले असून, ही स्पर्धा येत्या मे व जून २०२५ मध्ये एमसीए गहुंजे इंटरनॅशनल स्टेडियम, पुणे येथे खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार  व स्टार स्पोर्ट्स  या वाहिन्यांवर करण्यात येणार आहे, ज्यामुळे ही स्पर्धा राज्यासह संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.