अलिबाग- मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळ कळमजे पुलावरील वाहतुक रात्री बंद करण्यात आली होती. पाच तासानंतर ही वाहतुक सुरळीत करण्यात आली. दक्षिण रायगडमध्ये सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे घोड नदीच्या पातळी मोठी वाढ झाली होती. मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळ असलेल्या कळमजे पुलाला नदीचे पाणी लागले होते. धोकादायक स्थितीत नदी पुलालगत वाहत होती. त्यामुळे महामार्गावरील पूलावरून जाणारी वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून रोखून धरली होती. त्यामुळे जवळपास पाच तास महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.
पहाटेच्या सुमारास पुलाखालून वाहणाऱ्या नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यात आली आहे. २ ऑगस्ट २०१६ साली सावित्री नदीवरील ब्रिटीश कालीन पुल पूरात वाहून गेला होता. या दुर्घटनेत जवळपास ४० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाकडून कळमजे पुलावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होतीय महामार्गावरील वाहतुक या कलावधीत निजामपूर मार्गे सुधागड पाली च्या दिशेने वळवण्यात आली होती.