अलिबाग – नगरपालिका निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र रायगड जिल्ह्यात महायुतीचा ताळमेळ अद्याप जमलेला नाही. असे असले तरी, शिवसेना शिंदे गट अजूनही युतीबाबत आशावादी आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. महायुती झाली तर त्याचे स्वागत करूच पण स्वबळाची भाषा कोणी करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा सुचक इशारा गोगावले यांनी सहयोगी पक्षांना दिला आहे.
नगरपालिका निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांना वाद बाजूला ठेऊन एकत्र यावे आणि आमदारांच्या संख्येनुसार त्या त्या ठिकाणच्या जागा वाटून घ्याव्या असा प्रस्ताव शिवसेना शिंदे गटाने ठेवला होता. मात्र खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचा हा प्रस्ताव धुडकावून लावला. प्रस्तावाची खिल्ली उडवत युती आणि जागा वाटपाच्या चर्चा समोरासमोर बसून करायच्या असतात अशी टिप्पणी त्यांनी केली होती.
नगरपालिकेच्या निवडणूका महायुती म्हणून लढवल्या जाव्यात अशी आमची आजही भूमिका असल्याचे भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. महायुती म्हणून एकत्र आलो तर जिलह्यात विरोधकांना स्थानच उरणार नाही. पण वेगवेगळे लढण्याची भाषा कुणी करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा सूचक इशारा गोगावले यांनी मित्रपक्षांना दिला.
भाजप बरोबर आमची चर्चा सुरू आहे. पण अजूनही त्यांच्याकडून काही निरोप आलेला नाही. निरोप आलाच तर विचार करू. युती झाली तर आनंदच आहे नाही झाली तरी आमची तयारी आहे असं गोगावले म्हणाले.
नगरपालिकेसाठी नवा प्रस्ताव
भरत गोगावले यांनी नगर पालिका निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव ठेवला आहे. ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला जास्त जागा द्यायच्या, ताकद पाहून जागा वाटपाचा हा प्रस्ताव आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.
