सांगली : तुमच्या सगळ्या चुकीची कृती पुढे आयुष्यात उपयोगी ठरते. कोणत्या चुका पुन्हा करू नयेत, हे त्यातून समजते. त्यामुळे आपण सतत प्रयत्न करणे हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. हार-जीत याचा विचार न करत लढत राहिले पाहिजे, असा सल्ला चित्रपट दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी महाविद्यालयीन तरुणांना इस्लामपूर येथे दिला.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आज सुरू झालेला युवा महोत्सव दोन दिवस चालणार असून, या महोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या युवा महोत्सवातून विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड केली जाणार आहे. शिवाजी विद्यापीठ कक्षेतील महाविद्यालयांच्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात श्री. मंजुळे यांच्या हस्ते आणि संस्थेच्या सचिव सरोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मंजुळे म्हणाले, ‘सैराट या यशस्वी चित्रपटातून काय शिकायला हवे, याचे नकारात्मक मत अनेकांनी मांडले. प्रेमासाठी तरुण पळून जातात. तसे पळून न जाता स्वत:वरील विश्वास सिद्ध करायला हवा, कर्तृत्व दाखवायला हवे. माता-पित्यांनीही मुलांच्या भावना समजून घ्यायला हव्यात हा संदेश देण्याचा प्रयत्न केला.’ त्यांनी आपल्या शालेय जीवनातील फसलेल्या व अपयशी ठरलेल्या पहिल्या अभिनयाच्या सादरीकरणाचा किस्सा विनोदपूर्ण शैलीत कथन केला.
संस्थेच्या सचिव श्रीमती पाटील म्हणाल्या, ‘जीवनात कला, संगीत, क्रीडा यांमधील नवनिर्मितीशीलता जपली पाहिजे व वाढवली पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात शिक्षक, पालकवर्ग यापेक्षा मुलांना साचेबद्ध अभ्यासक्रमात व जीवघेण्या स्पर्धेत गुंतवून त्यांच्या क्षमता नष्ट करतात. हे होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे.
प्रारंभी प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. आर. पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. टी. एम. चौगुले उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आज सुरू झालेला युवा महोत्सव दोन दिवस चालणार असून, या महोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या युवा महोत्सवातून विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवासाठी निवड केली जाणार आहे.