नांदेड : नांदेड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या अमली पदार्थांचा साठा आणि विक्री विरुद्ध कारवाई होत असताना विमानतळ पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री हेरॉईन जप्त केले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेरॉईन सापडण्याची ही नांदेडमधील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड शहर व परिसरात अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होतात. अफू, गांजा, डोडे तसेच मेडिकल स्टोअर्सवर वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या गोळ्या सर्रासपणे विक्री होतात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खा. रवींद्र चव्हाण यांनी याबाबत आवाज उठवला होता. नांदेड शहरातल्या आनंदनगर, भाग्यनगर, कौठा, विष्णुपुरी या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहतात. वेगवेगळ्या जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ सहज उपलब्ध होतात, असा आरोप खासदार रवींद्र चव्हाण यांनी केला होता.
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी शहरातल्या सहा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. शिवाय शहरातील सर्व औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना समज देण्यात आली होती. अन्न व औषध प्रशासन व पोलिसांनी काही औषधी विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली. बुधवारी रात्री नमस्कार चौकातील एका पेट्रोल पंपाजवळ हेरॉईन विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी सापळा रचला. पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन. साने यांच्या पथकाने छापा टाकून हेरॉईनचे एक पाकीट व नशेच्या गोळ्या जप्त केल्या. या प्रकरणात गुरुवीरसिंह हरपालसिंग संधू (वय ५५) व जगजीतसिंघ अवतारसिंघ गिल (वय ४०) रा. गुरुद्वारा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एन. साने करीत आहेत. गुरुवारी या दोन आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडी सुनावली.
अमली पदार्थाच्या विरोधात नांदेड पोलिसांची सक्त कारवाई सुरू आहे. शहराल्या वेगवेगळ्या भागांतील औषध विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या १६ कारवाया गेल्या दोन महिन्यांत झाल्या आहेत. अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले आहे. बुधवारी विमानतळ पोलिसांनी केलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. अंमली पदार्थांच्या विक्री संदर्भात माहिती मिळाल्यास संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवावे. -अबिनाशकुमार,पोलीस अधीक्षक, नांदेड