राष्ट्रवादी १०, भाजप ४, शिवसेना २, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी १
तुळजापूर बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आघाडीने १८ पकी १६ जागा जिंकून जिल्ह्यात राजकीय भूकंप घडविला. राष्ट्रवादीचे युवा नेते विनोद गंगणे यांनी आपल्या पॅटर्नने बलाढय़ काँग्रेसला चारीमुंडय़ा चीत केले. विजयकुमार गंगणे यांच्याकडे अध्यक्षपदाची माळ येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
तुळजापूर बाजार समिती स्थापनेपासून ती कायम काँग्रेस पक्षाच्या बाजूने कार्यरत आहे. या वेळी प्रथमच राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आघाडीच्या कुलस्वामिनी शेतकरी विकास पॅनेलला यश मिळाले. माजी मंत्री मधुकर चव्हाण, कुलस्वामिनी सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, जि.प. अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, मावळते अध्यक्ष सचिन पाटील या दिग्गजांना या निकालाने धक्का बसला.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आघाडीचे नेतृत्व करणारे युवा नेते विनोद गंगणे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी जि.प. अध्यक्ष जीवन गोरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अनिल काळे, भाजपचे रोहन देशमुख, शिवसेनेचे गणेश सोनटक्के, भाजप तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, सेनेचे शहरप्रमुख सुधीर परमेश्वर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रम देशमुख, माजी अध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगरसेवक विशाल रोचकरी, गटनेते नारायणराजे गवळी यांच्या एकत्रित प्रयत्नाला यश मिळाले आहे.
मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून आडपडदा न ठेवता लक्ष्मी दाखविली, तसेच काँग्रेसकडून अयोग्य उमेदवार दिल्याबरोबरच बाजार समितीची सत्ता अनेक वर्षांत एकाच घरात फिरू लागल्याचा राग मतदारांनी व्यक्त केला. मातबर काँग्रेसची यात दाणादाण उडाली. केवळ एका जागेवर या पक्षाला विजय मिळवता आला. भाजप-सेनेचे उमेदवार बाजार समितीत प्रथमच पोहोचले.
जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अनिल काळे यांनी काँग्रेसवर टीका करताना तालुक्यातील सहकारी संस्था क्रमाक्रमाने बंद पडल्याचा राग तालुक्यातील जनतेच्या मनात आहे. तो यातून व्यक्त झाल्याचे सांगितले. तुळजापूर शहराने या वेळी बाजार समितीची निवडणूक खेचून आणली असल्याने याचा ग्रामीण भागाबरोबर आगामी वर्षांत होणाऱ्या जि.प. व पंचायत समितीसह नगरपालिका निवडणुकांवर परिणाम होणार आहे.
  संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित  
 तुळजापूरमध्ये राजकीय भूकंप; बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता
राष्ट्रवादी १०, भाजप ४, शिवसेना २, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी १
Written by लोकसत्ता टीम
  Updated:   
   First published on:  22-04-2016 at 00:23 IST  
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp control tuljapur market committee