भाजपने झिडकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अखेर विरोधकांच्या भूमिकेत गेली असून दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेजच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रही आहेत. मात्र विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी दोघांमध्येही रस्सीखेच व कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आर.आर.पाटील यांचे नाव निश्चित केले असल्याचे गटनेते अजित पवार यांनी सांगितले.
भाजप-शिवसेना ज्याप्रमाणे सरकारमध्ये एकत्र आले, त्याप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकत्र यावे, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी चर्चाही केली. पण त्यात विरोधी पक्षनेतेपदावरून तडजोड झाली नसून दोन्ही काँग्रेसकडून विधानसभा व विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपदाचा दावा केला आहे. भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करून विरोधकांना दुबळे करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर विधानसभेत काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याची निवड व्हावी, असे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसने आर.आर.पाटील यांचे नाव जाहीर केल्याने हा तिढा अजून सुटलेला नाही, हेच दिसून आले. त्यामुळे दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय मंगळवारीही होऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp in the role of the opposition