आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी लाटेमुळे प्रफुल्लीत झालेल्या भाजपाने रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन मिरजेत केले असून सांगलीचे आ. संभाजी पवार व जतचे आ. प्रकाश शेंडगे यांना या मेळाव्यापासून अलिप्त ठेवले असताना राष्ट्रवादीतून भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या नेत्यांना मात्र पायघडय़ा घालण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. सुरेश खाडे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून होत असलेल्या खासदारांच्या सत्कार समारंभाचे अध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीचे अजित घोरपडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. 
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात महायुतीला अभूतपूर्व मताधिक्य मिळाल्याने भाजपामध्ये फिलगुड वातावरण असून आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोमाने सुरू आहे. मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीतील बरीच नेते मंडळी भाजपाच्या वाटेवर असलीतरी पक्ष प्रवेशासाठी मुहूर्त अद्याप शोधलेला नाही. महायुतीमध्ये जागा वाटप कशा पद्धतीने होते. यावरच असंतुष्टांचा पक्ष प्रवेश अवलंबून असल्याने सध्या वेट अॅण्ड वॉच याच भूमिकेतून पाहण्यात येत आहे. 
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ. सुरेश खाडे यांच्या पुढाकाराने भाजपाचे खा. संजयकाका पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन रविवारी मिरजेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थितांमध्ये महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष निती केळकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक िशदे, सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, शहर जिल्हाध्यक्ष शेखर इनामदार, राष्ट्रीय समाज पक्षाचे गोपीचंद पडळकर, नितेश वाघमारे, संभाजी मेंढे, नगरसेवक धनपाल खोत, श्रीमती वैशाली कोरे आदींना आमंत्रित करण्यात आले आहे. 
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या प्रचारापासून अलिप्त राहिलेले   सांगलीचे संभाजी पवार आणि व्यासपीठावरून एक तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळी भूमिका घेणारे जतचे आ. प्रकाश शेंडगे यांना या सत्कार समारंभापासून अलिप्त ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हकालपट्टी केलेले जतचे विलासराव जगताप यांना या मेळाव्यासाठी खास निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील भाजपामध्ये असणारे मतभेद चव्हाटय़ावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  संग्रहित लेख, दिनांक 1st Jun 2014 रोजी प्रकाशित  
 सांगलीत भाजपच्या आजच्या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी पायघडय़ा
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदी लाटेमुळे प्रफुल्लीत झालेल्या भाजपाने रविवारी जाहीर मेळाव्याचे आयोजन मिरजेत केले असून सांगलीचे आ. संभाजी पवार व जतचे आ. प्रकाश शेंडगे यांना या मेळाव्यापासून अलिप्त ठेवले असताना राष्ट्रवादीतून भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या नेत्यांना मात्र पायघडय़ा घालण्यात आल्या आहेत.
  First published on:  01-06-2014 at 02:30 IST  
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leaders welcome for bjp todays rally in sangli