छत्रपती संभाजीनगर : छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला लातूर येथे झालेल्या मारहाणीचे पडसाद धाराशिवमध्येही उमटले. राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरची मोडतोड करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना धाराशिव शहरातही छावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून तटकरे यांनी शांतपणे आंदोलकांची भूमिका ऐकून घेतली. राष्ट्रवादीचा मेळावा आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधून तटकरे सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी बाहेर पडले. मात्र तोवर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजीसह निषेध सुरूच होता.

धाराशिव शहरातील परिमल मंगल कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मेळावास्थळी जाण्यापूर्वीच छावा संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी सुरू केली. येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयासमोर बराच वेळ जोरदार घोषणाबाजी सह छावा संघटनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

जिल्हा कार्यालयाबाहेर तटकरे यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या फलकाची छावाच्या आक्रमक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मोडतोड करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना शांत करण्यासाठी काही काळासाठी ताब्यातही घेतले होते. जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा सुरू असताना त्या ठिकाणीही छावा संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी शांतपणे त्यांचे निवेदन सादर करावे, आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार असल्याचे आवाहन तटकरे यांनी केल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. ते स्वीकारून तटकरे यांनी आंदोलकांशी बातचीत केली आणि त्यांचे म्हणणेही ऐकून घेतले.

लवकरच नवा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुवरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. मात्र अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. पक्षाच्या बैठकीत त्यावर योग्य ती कार्यवाही होईल. आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पक्ष संघटनेच्या अनुषंगाने नवीन जिल्हाध्यक्ष जाहीर केला जाईल. लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना राणाजगजित सिंह पाटील सध्या राष्ट्रवादी पक्षात सक्रिय नसल्याचेही तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.