Nilesh Rane on Malvan Municipal Council Election : राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीची लगबग चालू झाली आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मालवण नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे) व भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. दरम्यान, आमदार निलेश राणे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचार सुरू केला असून त्यांनी भारतीय जनता पार्टीला आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, “मालवण नगरपरिषदेची निवडणूक लागली आहे. येथील स्थानिक शिवसेना आमदार म्हणून मी काम करत आहे. शिवसेनेने या भागात मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्याचं आम्हाला निवडणुकीत फळ मिळेल.

निलेश राणे म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही शिवसेनेची संघटना बांधली आहे आणि लोकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्याच विश्वासावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. चांगले, पारदर्शक व निष्कलंक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांनी कधी कुठे भ्रष्टाचार केला नाही, कुठल्या गुन्ह्यात त्यांचं नाव आलं नाही, जे लोक नगरपालिकेला आपलं उदरनिर्वाहाचं साधन समजत नाहीत, अशा लोकांना आम्ही उमेदवारी दिली आहे आणि आता आम्ही लोकांच्या न्यायालयात जात आहोत. मला विश्वास आहे लोक आमच्या ओंजळीत मतांचं दान टाकतील.”

“नगराध्यक्षांसह आमचे सर्व उमेदवार निवडून आणू”

शिवसेना (शिंदे) आमदार म्हणाले, “आम्ही मालवण नगरपालिका व शहर जागतिक दर्जाचं केलं आहे. आता त्याला आकार उकार देणं बाकी आहे. या शहराला २१ व्या शतकातील शहर बनवणं, दर्जेदार व पारदर्शक कारभार पुरवणं, यावर आमचं लक्ष असेल. आमच्या स्पर्धेत कोण असणार आहे याकडे आमचं लक्ष नाही. लोकांना दर्जेदार सुविधा देणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे. आम्ही या निवडणुकीत नगराध्यक्षांसह आमचे सर्व उमेदवार निवडून आणू.”

दरम्यान, निलेश राणे यांना यावेळी विचारण्यात आलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे आव्हान म्हणून पाहता का? त्यावर राणे म्हणाले, “आमची कोणाशीच स्पर्धा नाही आणि आम्ही कोणाला स्पर्धा देत नाही. आमचं लक्ष मालवण शहराच्या विकासावर आहे आणि आम्ही निवडणुकीचा ट्रॅक बदलणार नाही, कोणालाही तो बदलू देणार नाही.”

नारायण राणेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय : निलेश राणे

“खासदार नारायण राणे यांनी शिवसेना व भाजपाची युती व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र आता त्यांनी आम्हाला सांगितलं आहे त्यानुसार आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. त्यांना सांगूनच सगळं काही करत आहोत. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनानुसार पुढे जात आहोत. त्यांनी सांगितल्यानंतरच आम्ही हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे आता आम्हाला शिवसेना व भाजपाच्या युतीची शक्यता वाटत नाही.”

“आमचा गुलाल पाहायला तयार राहा”, निलेश राणेंचं आव्हान

निलेश राणे म्हणाले, “आम्ही भाजपाकडे बघत नाही. मुळात आम्ही भाजपाकडे का पाहू? आमची या भागात मोठी ताकद आहे. त्यामुळे आमच्या फॉर्म्युल्यावर किंवा आमच्या अस्तित्वावर कोणीही चर्चा करू नये. आमचे फटाके आणि गुलाल बघायची तयारी ठेवा. येत्या ३ तारखेला तुम्हाला आमचे फटाके व गुलाल पाहायला मिळेल. बाकी कोणी यावर काय म्हणतंय त्याच्याशी माझं देणं घेणं नाही.”