अलिबाग– जिवघेण्या हल्ला प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने गुरुवारी तब्बल २१ जणांना दोषी ठरवत सात वर्ष सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. या खटल्यातून झिराड येथील नितेश गुरव याला न्यायालयाने निर्दोष सोडले. मात्र हा दिलासा काही काळच टिकला. न्यायालयातून घरी पोहोचताच त्याचे दुर्दैवी निधन झाले.
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे ११ सप्टेंबर २०१२ रोजी पूर्व वैमनस्यातून दिलीप भोईर यांच्यासह २५ जणांनी विटेक काँम्पूटर इन्स्टीस्टूट वर हल्ला केला होता. क्लासची तोडफोड करण्यात आली होती. यात पाच जण जखमी झाले होते. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात आरोपी म्हणून नितेश गुरव याचाही समावेश होता. या प्रकरणात अलिबाग सत्र न्यायालयाने गुरवारी निकाल दिला.
या गुन्ह्यातील २५ पैकी २१ जणांना न्यायालयाने दोषी ठरवत, सात वर्ष सक्त मंजूरी आणि तीन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. तर ४ जणांना पुरव्या आभावी निर्दोष सोडले. यात नितेश गुरव याचा समावेश होता. एका महत्वाच्या खटल्यातून त्याची निर्दोष सुटका झाली. त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटूंबियांना मोठा दिलासा मिळाला होता.
न्यायालयाने निर्दोष सोडल्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतला. पण घरी पोहोचताच त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे घरच्यांनी त्याला चोंढी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. या घटनेमुळे झिराड परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता असे सांगितले जात आहे. न्यायालयातून घरी येताच त्याचे निधन झाल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.
