अहमदनगरमधील पूणतांबा गावातील शेतकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक निष्फळ ठरली असून संपाबाबत शेतकरी ठाम आहेत. बैठकीत अपेक्षित तोडगा न निघाल्याने १ जूनपासून संपावर जाणारच असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यात ग्रामसभा घेऊन १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. या निर्णयानंतर राज्यातील अन्य भागातील शेतकरी संघटनांनीही संपावर जाण्याची तयारी केली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू व्हावा, शेतकऱ्यांसाठी सेवानिवृत्ती योजना सुरू करावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत.
शेतकऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी किसान क्रांती शेतकरी संघटना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत वाटाघाटी झाल्या असल्या तरी चर्चेअंती शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवर कायम होते असे समजते. तर फडणवीस यांनी कर्जमाफीसंदर्भात आश्वासन दिले. पण यावर समाधान न झाल्याने शेतकऱ्यांनी संपावर जाणारच असा पवित्रा घेतला. गावात जाऊन आम्ही संपाची तयारी करु अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. अहमदनगर आणि औरंगाबाद येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत संपावर जाण्याबाबत मोर्चेंबांधणी केली होती.
गावोगावी सभा, पत्रकबाजी
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून कृषिमालास भाव मिळत नसताना दुसरीकडे कर्जाचा डोंगर वाढत आहे. जिल्हा बँकेतून गरजूंना कर्ज मिळत नाही आणि आहे ते पैसे काढणेही अवघड झाले आहे. नैराश्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे १ जूनपासून म्हणजे खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. गावोगावच्या शेतकऱ्यांना संपात सहभागी करून घेण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी जिल्ह्यात तालुकानिहाय, गाव पातळीवर बैठका असे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. गावात संप तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सचित्र माहितीपूर्ण फलक लावण्यात येत आहे.