अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगरपंचायत व १ नगरपरिषद अशा १२ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींनाही वेग आलेला आहे.
गेल्या किमान सहा वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपंचायती व ४२ नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड या नगरपरिषदांसह व १ नेवासा नगरपंचायतचा समावेश आहे. आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमामध्ये नामनिर्देशन अर्ज दि. १० ते २७ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारले जातील.
जिल्ह्यातील १२ नगरपालिकांमधील मतदार केंद्रांच्या अंतिम मतदार याद्या शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. जिल्ह्यात बारा पालिकांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत तर तहसीलदार व मुख्याधिकारी यांना सहायक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तेच उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहेत. यंदा प्रथमच सहायक निवडणूक अधिकाऱ्याची दोन पदे नियुक्त करण्यात आली आहेत. रविवार व सुटीच्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत.
प्राप्त अर्जांची छाननी दि. १८ नोव्हेंबरला सकाळी ११ वा. होईल. वैध अर्जदारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत दि. १९ ते २१ नोव्हेंबरला दुपारी ३ वा. प्रसिद्ध केली जाईल. माघारीनंतर उमेदवारांना २६ नोव्हेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान दि. २ डिसेंबरला असून मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे. त्यानंतर दि. ३ डिसेंबरला सकाळी १० वा. पासून मतमोजणी प्रक्रिया राबवली जाईल. उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा लागणार आहे. सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १ हजार रुपये तर अनुसूचित जाती उमेदवारांसाठी ५०० रुपये इतकी अनामत रक्कम आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराला एक सूचक, तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक आवश्यक असतील. अर्जदार व सूचक यांच्यावर कोणतीही थकबाकी नसावी. उमेदवारांना मालमत्ता व गुन्हेगारी संदर्भातील दोन स्वतंत्र हमीपत्र सादर करावे लागतील.
महायुती व ‘मविआ’ची अद्याप घोषणा नाही
उद्या, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होत असले तरी अद्यापि जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीबाबत नेत्यांनी अधिकृतपणे घोषणा १२ पैकी एकाही ठिकाणी केलेली नाही. महायुती व महाविकास आघाडीबद्दल अद्यापही कोठेच चर्चेला सुरुवात झालेली नाही, परिणामी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. शिर्डीमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उत्तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र निर्णय झालेला नाही.
