Astrophysicist Dr Jayant Narlikar Died : जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला‌. आंतररष्ट्रीय स्तरावर त्यांची ख्याती होती. खगोलशास्त्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना अनेकांच्या मनात आत्ता आहे. डॉ जयंत नारळीकर रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रिज या विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा उचलला. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. आज पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

सोप्या भाषेत विज्ञान समजावणं ही त्यांच्या लेखनाची खासियत

जयंत नारळीकर यांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकं लिहिली. आकाशाशी जडले नाते या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. जयंत नारळीकर यांची साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे

जयंत नारळीकर यांची पुस्तकं

  1. अंतराळातील भस्मासुर
  2. अंतराळातील स्फोट
  3. अभयारण्य
  4. चला जाऊ अवकाश सफरीला
  5. टाइम मशीनची किमया
  6. प्रेषित
  7. यक्षांची देणगी
  8. याला जीवन ऐसे नाव
  9. वामन परत न आला
  10. व्हायरस
  11. अंतराळ आणि विज्ञान
  12. आकाशाशी जडले नाते
  13. गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
  14. नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
  15. नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
  16. Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
  17. विज्ञान आणि वैज्ञानिक
  18. विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  19. विज्ञानाची गरुडझेप
  20. विज्ञानाचे रचयिते

जयंत नारळीकर यांना विज्ञानाचं बाळकडू घरातून मिळालं

डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे १९ जुलै १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणिततज्ञ आणि वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते तर आई सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. शालेय शिक्षण वाराणसी येथे झाल्यानंतर विज्ञान शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज गाठल्यानंतर त्यांनी बीए, एमए आणि पीएचडी पदवी मिळवली. याशिवाय रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे त्यांनी पटकावली.

जयंत नारळीकर यांना मिळालेले पुरस्कार आणि मानाची पदं

१९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार
२००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार
२०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कार
२०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
जयंत नारळीकर यांच्या ‘चार नगरांतले माझे विश्व’या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
’यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१)