अहिल्यानगर: शहरात तीन दिवसांपूर्वी लक्ष्मीमातेच्या यात्रेदरम्यान झालेल्या किरकोळ वादातून आज, गुरुवारी दुपारी दोन कुटुंबात वाद होऊन घर, कार्यालय व वाहनांची तोडफोड झाल्याची घटना घडली. नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत ही घटना घडली. यात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दिल्लीगेट परिसरात २२ जुलैला दुपारी काढण्यात आलेल्या लक्ष्मीमातेच्या यात्रेदरम्यान गाडी बाजूला घेण्यावरून दोन कुटुंबात वाद झाले होते. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी होऊन विनयभंगाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
आज पुन्हा हा वाद उफाळून आल्यावर तोडफोड व हाणामारीची घटना घडली. तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री उशिरा या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ताहराबाद यात्रेत लुटारू टोळी जेरबंद
राहुरी तालुक्यातील ताहराबाद यात्रेतील भाविकांवर दरोडा टाकण्यासाठी आलेली टोळी राहुरी पोलिसांनी जेरबंद केली. या टोळीला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या टोळीत चार महिलांचा समावेश आहे. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली.
राहुरीतील ताहराबाद येथे संतश्रेष्ठ महिपती महाराज यात्रा २१ जुलै ते आज, गुरुवारपर्यंत सुरू होती. यात्रेदरम्यान दरोडा टाकून भाविकांना लुटण्याच्या उद्देशाने काही महिलांचा समावेश असलेली टोळी यात्रेत शिरल्याची गोपनीय माहिती काल, बुधवारी राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शोध घेऊन शासकीय पंचांसह छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत संगीता सुभाष गायकवाड (वय ४५), परिघा नाना राखपसरे (वय ६०), सरस्वती दत्तू खंदारे (वय ५२, सर्व रा. अशोकनगर, श्रीरामपूर), मोनिका अशोक चव्हाण (१९), सहारा प्रशांत चव्हाण (१९, दोन्ही रा. भानस हिवरा, ता. नेवासा) व असलम अकबर शेख (३९) हे दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीत असताना पोलिसांना आढळले. त्यांना आज, गुरुवारी राहुरीतील न्यायालयापुढे हजर करण्यात आले. सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता श्री गागरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गणेश वाघमारे, अंमलदार विकास साळवे, विजय नवले, जानकीराम खेमनर, अशोक झिने, गणेश मैड, अंकुश भोसले, नदीम शेख, इफ्तिकार सय्यद, वंदना पवार, मीना नाचन, श्रीरामपूर आरसीबी पथकातील सुनील वाघचौरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.