जालना : खऱ्या उत्कट प्रेमाला भाषेचा अडसर नसतो. ते अनुभवावे आणि समजून घ्यावे लागते, असे प्रसिद्ध चित्रपट, नाट्य तसेच दूरचित्रवाणी कलाकार शेखर सुमन यांनी येथे सांगितले. प्रसिद्ध गीतकार, कवी साहिर लुधियानवी आणि प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांच्या अधुऱ्या प्रेमकथेवर आधारित “एक मुलाकात, या नाट्य-गीत सादरीकरणाच्या निमित्ताने जालना येथे आले असता माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. कर्करोग रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने जालना शहरातील अनुराग कपूर यांनी कलश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून साहिर लुधियानवी आणि प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांच्या अधुऱ्या प्रेमकथेवर आधारित हा कार्यक्रम आयोजित केला होता.
शेखर सुमन म्हणाले, अत्युत्कट प्रेमाची अधुरी कथा नितांत सुंदरच असते. जगातील अनेक अमर प्रेमकथा अधुऱ्याच राहिलेल्या आहेत. अशा प्रेमकथांना दुःखाची एक किनार असते आणि ती अशा कथांना नितांत सुंदर करून जाते. सध्याच्या जगात अनेकदा आपल्याला प्रेम आणि माणुसकी शिल्लक राहिलेली दिसत नाही.
एका भौतिक जगात आपण वावरत असतो. नाती सांभाळण्याऐवजी सगळीकडे भौतिक सुविधांची ओढ आणि पैशाची भूक सध्या दिसून येते. ‘एक मुलाकात ‘ची संहिता लिहिल्यावर दिग्दर्शक आणि लेखक सैफ हैदर हुसेन प्रथम अभिनेत्री दीप्ती नवल यांच्याकडे गेले. त्यांनीच या नाट्यातील भूमिकेसाठी माझे नाव सूचविले. दीप्ती नवल यांनी शंभर प्रयोगांत भूमिका केली आणि त्यानंतर गितिका त्यागी ही भूमिका साकारीत आहेत.
दीप्ती नवल पंजाबी भाषेत आणि मी उर्दूमध्ये सादरीकरण करीत असे. नंतर गितिका त्यागी हिंदीत तर मी उर्दूत सादरीकरण करतो. मी लहानपणापासून साहिर लुधियानवी यांच्या रचनांच्या प्रेमात आहे. लहानपणी माझ्या काकांनी लुधियानवी यांचे ‘परछाईया’ नावाचे कवितांचे पुस्तक वाचावयास दिले होते. सध्याच्या ओटीटी प्लॅटफार्मवर चांगले आणि वाईट दोन्हीही दिसते. त्यापैकी आपण चांगले निवडावे, असेही शेखर सुमन म्हणाले.
