शांघाय (चीन) येथे पुढीलवर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून, या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज्यातील तब्बल २२ हजार ९० युवक-युवतींनी यात सहभाग घेतला, असल्याची माहितीही मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

विविध ४७ क्षेत्रातील कौशल्यावर आधारीत ही स्पर्धा होत असून, सर्वाधिक २ हजार ११८ अर्ज इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशनसाठी आले असून ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी १ हजार २३१, सीएनसी मिलिंगसाठी २६३, सीएनसी टर्निंगसाठी ४७९, इलेक्ट्रॉनिक्ससाठी १ हजार ८६, फॅशन टेक्नॉलॉजीसाठी ४५०, हेल्थ आणि सोशल केअरसाठी ५४२, आयटी नेटवर्क केबलसाठी ३१७, मेकॅनिकल इंजिनिअरींगसाठी ३४४, प्लंबिंग आणि ॲम्प हिटींगसाठी २९५, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगसाठी ३८४ तर वेल्डींगसाठी १ हजार ११ युवकांनी कौशल्य सादरीकरणासाठी नोंदणी केली आहे. याशिवाय थ्रीडी डीजीटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी,ब्युटी थेरपी, ब्रुकलेयींग,कॅबिनेट मेकींग, कारपेंटींग, कारपेन्ट्री, क्लाऊड कॉम्पुटींग, सीएनसी मिलींग, कॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकींग, सायबर सिक्युरीटी, फ्लॉरिस्ट्री, ग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजी, हेअर ड्रेसिंग, इंडस्ट्रीयलकंट्रोल, ज्वेलरी, जॉईनरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्लंबिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रेस्टॉरंट सर्व्हीस, वॉटर टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी आदी सेक्टरमधील आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी युवक-युवतींनी नोंदणी केली आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण व रोख बक्षिसे देणार –

जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. २०२२ मध्ये शांघाय (चीन) येथे ही स्पर्धा आयोजित होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेच्या स्वरूपात १७ व १८ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाली. या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात विभागीय स्पर्धा २३ व २४ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहे. विभागीय विजेते उमेदवार ३, ४ व ५ सप्टेंबर २०२१ रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. राज्यस्तरावरील विजेते उमेदवार डिसेंबर २०२१ मध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र ठरतील. देशपातळीवर निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

यापूर्वी जागतिक स्तरावरील ४५ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन कझान (रशिया) येथे करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यात महाराष्ट्रातून ७ आणि फ्युचर स्किलसाठी १ स्पर्धक अशा एकूण ८ स्पर्धकांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ट सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून १३ व्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. तसेच महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ट सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढीलवर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवक-युवतींना उत्कृष्ट संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunity for the youth of the state to participate in the international skills competition to be held in shanghai nawab malik msr