कराड : जनतेला जे हवे ते हे सरकार काम करत आहे. त्यामुळे मालेगावसह कोणत्याही निकालाविषयी पुढे आम्ही काय करावे हे विरोधकांनी युती सरकारला शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

गोरे म्हणाले, ‘मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भातील न्यायालयाने दिलेला निकाल हा जनतेच्या मनातला निकाल लागला आहे. त्यामुळे या निकालाविरोधात राज्य सरकार पुढे अपील करणार का? असा प्रश्न करणाऱ्या विरोधकांनी युती सरकारला शहाणपण शिकवण्याची गरज नाही.’

पृथ्वीराज चव्हाण यांनी भगव्या दहशतवादाऐवजी ‘सनातन दहशतवाद’ म्हणावे, असे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता मंत्री गोरे म्हणाले, हीच मंडळी यापूर्वी ‘भगवा दहशतवाद’ असे म्हणत होती. आता न्यायालयाने त्यांना चांगली चपराक दिली आहे. मालेगाव घटनेवेळी लोकांवर भगवा दहशतवादी असा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली. हिंदू लोकांवर अशी कारवाई करणे काँग्रेसचे सातत्याने चाललेले षडयंत्र आहे. ते आता यानिमित्ताने समोर आल्याची टीका त्यांनी केली.

आता या निकालामुळे अस्वस्थ झालेल्या या विरोधकांना आपल्या ‘भगवा दहशतवाद’ या चर्चेची किंमत मोजावी लागली आहे. यातूनच पुन्हा चुका करत ही मंडळी नव्याने काही वक्तव्ये करत आहेत. ‘सनातन दहशतवाद’ हा शब्दयोग हा या अस्वस्थेतूनच पुढे आला आहे. या बद्दलही राज्यभर आंदोलन सुरू होताच त्यांना या भूमिकेपासूनही पळ काढवा लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून भगव्या ध्वजाला महत्त्व आहे. म्हणून त्याविषयी आम्हाला अभिमान आहे. हिंदू दहशतवादी कधीच असू शकत नाही. मात्र, या ध्वजावरसुद्धा विरोधक राजकारण करत आहेत. ही बाब चुकीची असल्याचे गोरे एका प्रश्नावर बोलताना म्हणाले.

जनतेला जे हवे तेच महायुतीचे सरकार काम करत आहे. त्यामुळे कोणत्या निकालाविषयी पुढे आम्ही काय करावे याबद्दलचा शहाणपण हे विरोधकांनी युती सरकारला शिकवण्याची गरज नसल्याचे मतही गोरे यांनी या वेळी व्यक्त केले.