जालना : प्रेमप्रकरणाच्या कारणावरून पोटच्या मुलीचा गळा दाबून खून करून तिचे प्रेत गळ्यास दोरी बांधून लटकवून आत्महत्या असल्याचे भासवणाऱ्या पित्यास बदनापूर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष कुकलारे शुक्रवारी रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ही घटना समोर आली.
शनिवारी दुपारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात हरी बाबूराव जोगदंड यांच्या मुलीने आत्महत्या केली असल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. मात्र मुलीच्या आत्महत्येबद्दल पोलिसांना संशय आला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर मुलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेच्या संदर्भात पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी अधिक तपास केला.
या प्रकरणात पुढे आलेल्या माहितीनुसार मृत मुलीचे एका मुलावर प्रेम होते. मात्र, मुलीचे प्रेमप्रकरण तिच्या वडिलांना आवडत नव्हते. या प्रेमप्रकरणामुळे आपला समाजात अवमान होईल असे त्यांना वाटत होते. त्यामुळे हरि जोगदंड यांनी मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिने आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी तिचे प्रेत या गळ्याला दोरी बांधून लटकावल्याचे पोलिस तपासात पुढे आले. बदनापूर पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदविला असून आरोपीस अटक केली आहे.