India vs Pakistan Asia Cup Match: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशभरातून असंतोष उसळला होता. भारतीय लष्कराने त्यानंतर राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले गेले. तसेच भारताने सिंधू जल करारालाही स्थगिती दिली. पाणी आणि रक्त एकत्र वाहणार नाही, अशी रोखठोक भूमिका भारताने घेतली होती. मात्र १४ सप्टेंबर रोजी आशिया चषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरून आता पुन्हा एकदा संतापाची लाट पसरली आहे. शिवसेनेने (ठाकरे) या सामन्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. तर पहलगाम हल्ल्यात ज्यांनी आपले नातेवाईक गमावले, ते रोष व्यक्त करत आहेत.
तुम्हाला काहीच लाज वाटत नाही का?
पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे मारले गेले होते. आज भारत-पाकिस्तान सामना होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळेने नाराजी व्यक्त केली. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, “इतक्या लोकांचा बळी गेल्यानंतरही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यात यांना काहीच कशी लाज वाटत नाही.
“ज्या लोकांमध्ये भावना नाहीत, तेच लोक अशाप्रकारचा निर्णय घेतात. बीसीसीआयने असे करायला नको होते. पहलगाम हल्ल्याला सहा महिनेही उलटले नाहीत. ज्या देशातून अतिरेकी येऊन आपल्या लोकांना मारून जातात. ज्यांच्याबरोबर आपले जुने वैर आहे. आपल्या कितीतरी जवान, सामान्य लोक अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले आहेत. तरी सुद्धा त्या देशाच्या क्रिकेट संघाबरोबर सामना घेत आहात, हे दुःखद आहे”, अशी भावना आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केली.
पाहा, आसावरी जगदाळे काय म्हणाल्या?
#WATCH | Pune, Maharashtra: On India vs Pakistan match today in Asia Cup 2025, Asavari Jagdale – daughter of Pahalgam terror attack victim Santosh Jagdale, says, "I think today's match should not have been held. There is still some time. But I don't think that the BCCI feels the… pic.twitter.com/6hz2oZFHQQ
— ANI (@ANI) September 14, 2025
आसावरी जगदाळे पुढे म्हणाल्या, “आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानात जावे लागू नये किंवा त्यांच्या क्रिकेटपटूंना इथे यावे लागू नये, यासाठी तुम्ही दुबईमध्ये चषक ठेवत आहात. याचा अर्थ तुम्ही अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानला निधी पुरवत आहात. फक्त करार स्थगित करून, पाणी आणि व्यापार बंद करून संबंध तोडले असे होत नाही. तुम्हाला जर मारल्या गेलेल्या लोकांबद्दल सहानुभूती असेल तर भारताने यापुढेही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू नये.”
आज भारत-पाकिस्तान सामना होत आहे, याचा अर्थ या लोकांनी पहलगाम हल्ल्यानंतर ज्या भावना व्यक्त केल्या त्या खोट्या होत्या का? तुमच्या घरातील किंवा तुमच्या जवळचे कुणी जात नाही, म्हणून तुम्हाला फरक पडत नाही का? कृपया अशा प्रकारचे कृत्य करू नका. यातून अतिरेकी कारवायांना एकप्रकारे समर्थनच मिळत आहे.
#WATCH | Kanpur, UP: On India vs Pakistan match in Asia Cup 2025, Aishanya Dwivedi – wife of Pahalgam terror attack victim Shubham Dwivedi, says, "After the match, Pakistan will have money once again. It will stand up once again and the hotbeds that were destroyed during… pic.twitter.com/E2Iob9k13E
— ANI (@ANI) September 14, 2025
ऐशन्या द्विवेदी यांनीही आपल्या पतीला पहलगाम हल्ल्यात गमावले होते. त्यांनीही एएनआयशी बोलताना बीसीसीआयवर नाराजी व्यक्त केली. क्रिकेट खेळ राष्ट्रीय आहे. क्रिकेटपटूंना आपण देशभक्त या नात्याने पाहतो. भारतीय संघातील एखाद-दुसरा खेळाडू वगळता कुणीही याविरोधात उघडपणे व्यक्त झालेले नाही. बीसीसीआयने त्यांना बंदुकीचा धाकावर तर खेळण्यासाठी तयार केलेले नाही. मग ते भूमिका घेण्यासाठी का कचरत आहेत, असा प्रश्न द्विवेदी यांनी उपस्थित केला.