रासायनिक ताडीचे प्रमाण वाढले; आरोग्यावर गंभीर परिणाम

ताडाच्या झाडांची संख्या कमी झाली असली तरी ताडी विक्रीचे परवाने अद्यापही दिले जात असले तरी त्यातून बोगस ताडी मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. विविध रसायनांपासून तयार केल्या जाणऱ्या या ताडीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

िशदी, ताड किंवा माड या झाडाच्या फळांच्या पेंडीच्या बुंद्याला छिद्र पाडून नळीद्वारे मडक्यात त्यातून स्रवणारा पांढरा रस गोळा केला जातो. सूर्योदयापूर्वी हा रस म्हणजे निरा असतो, पण सूर्योदयानंतर काही काळाने हवेतील परिणामांमुळे निरेचे ताडीत रूपांतर होते. ताडीमध्ये इथील अल्कोहोल असते. आठ तासांपेक्षा जास्त वेळ ताडी राहिल्यास ती पिण्यायोग्य राहत नाही. पण आता िशदी किंवा ताडीची झाडेच शिल्लक राहिलेली नाही. गडचिरोली, किनवट, नंदुरबार, नाशिक, डहाणू या भागांत तसेच कोकणात काही प्रमाणात ही झाडे आहेत. त्यांची संख्या अत्यल्प झाली आहेत. त्यामुळे आता रसायनांच्या माध्यमातून ताडी बनते.

क्लोरल हायडेट किंवा गॅमेक्झीन, िलबाचा रस, साखर किंवा सॅक्रिन, स्विटनर व रिठय़ाचा फेस या मिश्रणापासून ताडी तयार केली जाते. ती सर्रासपणे दुकानात परवाना असल्याच्या नावाखाली विकली जाते. ती बनविण्याकरिता अत्यंत कमी म्हणजे दोन ते पाच रुपये लिटरला खर्च येतो, मात्र ती पन्नास रुपये लिटरने विकली जाते. स्वस्तात नशा करायला मिळते म्हणून मजूरवर्ग हा त्याकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षति झाला आहे. कायम ताडी पिणाऱ्यांना गुंगी येते. लगेच झोप लागते. रसायनांमुळे आता अनेकांचे चेहरे हे काळे पडले आहे, ते शरीरानेही खंगतात, शरीराचे अनेक अवयव निकामी होतात. मूत्रिपड निकामी होणे, हृदयविकार अशा विकारांनाही ते बळी पडतात. हा प्रकार स्लो पॉयझिनगसारखा असल्याने ताडी जीवघेणी आहे हे लक्षात येत नाही. त्यामुळे विषारी दारूने जसे बळी गेले की सरकार खडबडून जागे होते, तसे ताडीच्या बाबतीत घडत नाहीत.

ताडी बनविण्याकरिता वापरले जाणारे क्लोरल हायडेट हे रसायन किरकोळ शत्रक्रियांमध्ये अल्प प्रमाणात वापरले जाते. जलतरण तलावातील पाणी स्वच्छ करण्याकरिता त्याचा वापर होतो. ते कुठल्याही औषध विक्रेत्यांकडे सहज उपलब्ध असते. तर गॅमेक्झीन हे मुंग्या मारण्याचे औषध आहे. ताडी पिणाऱ्यांना गुंगी यावी म्हणून अल्प प्रमाणात ते टाकले जाते. ताडीची चव गोड-आंबट व तुरट येण्याकरिता अन्य घटक वापरतात. काहीजण तर रिठय़ाऐवजी कपडे धुण्याची पावडर टाकतात.

कारवाईत दिरंगाई

दारूबंदी व उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकारी ताडीदुकानांवर छापे टाकून ताडीचे नमुने घेतात. हे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळा किंवा हाफकिन संस्थेकडे तपासणीसाठी पाठवितात. त्यात क्लोरल हायड्रेट असल्याचा अहवाल आला की, मग जिल्हाधिकारी त्या दुकानाचा परवाना रद्द करून फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देतात. यापूर्वी अशा प्रकारे अनेकदा कारवाई करण्यात आली आहे, मात्र दारूबंदी व उत्पादनशुल्क विभागाला भेसळीवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. दोन्ही विभाग एकमेकांवर ढकलून मोकळे होतात, त्यामुळे कारवाई होत नाही. या धंद्यात आंध्र प्रदेशातील विक्रेत्यांची एक मोठी लॉबी कार्यरत आहे. ही लॉबी पोलीस, दारूबंदी व उत्पादनशुल्क, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपली अर्थमोहिनी टाकतात. त्यामुळे लोकांच्या जीवनाशी खेळणारा हा उद्योग अजूनही सुरूच आहे.

ताडी विक्रेते हे दुकानांचे लिलाव व्हावे म्हणून तलाठय़ांना हाताशी धरून सात-बाराच्या उताऱ्यावर िशदी किंवा ताडीची झाडे असल्याची खोटी नोंद करून घेतात. लिलाव करण्यापूर्वी केवळ सात-बाराचा उतारा पाहण्याऐवजी समक्ष जाऊन दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करणे अपेक्षित असते, पण तसे घडत नाही. कागदावर झाडे असली की लिलावाची प्रक्रिया होते. दारूबंदी विभागाच्या आयुक्त व्ही. राधा यांनी हे प्रकार थांबविण्यासाठी पूर्वी ५०० झाडाला एक दुकान हा नियम बदलून एक हजार झाडांसाठी एक दुकान असा नियम बनविला. त्यामुळे नगर जिल्ह्य़ात आता एकाही दुकानाचा लिलाव झाला नाही. असे असले तरी पांगरमल येथील दारूमृत्युकांड होईपर्यंत ताडी दुकाने सुरू  होती, ती आता बंद झाली. राज्यात अनेक भागांत दुकानांना परवाने नसले तरी ताडी विकली जात आहे हे विशेष. नगर जिल्ह्य़ात मागील वर्षी घातक विषारी ताडी तयार करून ती विकणारे आंध्र प्रदेशातील सात दुकानदारांना पकडण्यात आले, पण त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात आली नाही. परवाने रद्द झाले की, पुढील वर्षी ते दुसऱ्यांच्या नावावर ताडी दुकानाचा लिलाव घेतात. यंदा एकाही दुकानाचा लिलाव जिल्ह्य़ात झालेला नाही.